कोल्हापूर : कुरुंदवाडमधील संभाव्य पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी | पुढारी

कोल्हापूर : कुरुंदवाडमधील संभाव्य पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : आपत्ती सांगून येत नाही, अचानक संभाव्य महापूराची परिस्थिती निर्माण झाल्यास महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवा. नागरिकांना महापुराच्या बाबतीत वरिष्ठ प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार तात्काळ स्थलांतर करा. जलमार्गाने, हवाई मार्गानेही स्थलांतर करण्याची यंत्रणा सज्ज ठेवा नागरिकांनीही प्रशासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

कुरुंदवाड येथे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडांगणाची आणि पालिका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनच्या तयारीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, पंचायत समितीचे नारायण घोलप, पालिकेचे मुख्याधिकारी अशिष चौहान उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांना आढावा देताना मुख्याधिकारी चौहान म्हणाले, पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेने २ यांत्रिकी बोट, लाईफ जॅकेट व आपत्तीचा सामना करण्यासाठी सामग्री तयार ठेवल्या आहेत. पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. हे कक्ष नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास कार्यरत असणार आहे. शक्यतो शहराला महापुराचा विळखा पडतो, त्यामुळे ऐनवेळी अकस्मित अत्यावश्यक पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी हवाई मार्गाचा अवलंब करावा लागला तर सीताबाई पटवर्धन हायस्कूल येथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. मार्गातून बाहेर पडण्यासाठी दोन यांत्रिकी बोटीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दत्त महाविद्यालय, एसपी हायस्कूल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा येथील नियोजित स्थलांतर केंद्राची तसेच कृष्णा घाट, अनवडी नदीसह शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार, मंडळ अधिकारी बबन पटकारे, तलाठी प्रतीक्षा ढेरे, पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे, अनिकेत भोसले, अमोल कांबळे, अभिजित कांबळे, प्रणाम शिंदे, पूजा पाटील, शशिकांत कडाळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button