बोरपाडळे : पुढारी वृत्तसेवा
पन्हाळा तालुक्यातील बोरीवडे येथील जवान संदीप श्रीपती पोवार यांचा गुरुवारी रात्री त्रिपुरा येथे सेवेत असताना मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव आज गावी बोरीवडे येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान संदीप पोवार यांचा मृत्यू सरावा दरम्यान स्वतःच्या शस्त्रानेच झाल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे उप निरीक्षक यु. डी. भट यांनी दिली.
बोरिवडे येथील जवान संदीप पोवार हे ११ वर्षापूर्वी सीमा सुरक्षा दलामध्ये रुजू झाले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांचा त्रिपुरा राज्यात आगरतळा येथे सेवा बजावत असताना, सरावा दरम्यान स्वतः च्या शस्त्राने मृत्यू झाला. आज सकाळी त्यांचे पार्थिव बोरीवडे गावात आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान संदीप पोवार यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी आणि दाेन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
यावेळी पोलीस दलाच्या वतीनं कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड , जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, तहसीलदार रमेश शेंडगे , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पोवार , गावच्या सरपंच मंगल शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. जवान संदीप पोवार यांच्या निधनाने आवळी बोरीवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जवान संदीप पवार यांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश ह्दय पिळवटून टाकणारा होता.
हेही वाचलं का ?