Kolhapur News: नृसिंहवाडीत कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली | पुढारी

Kolhapur News: नृसिंहवाडीत कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली

विनोद पुजारी

नृसिंहवाडी: मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच कृष्णा नदीची पाणी पातळी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे गढूळ पाण्यामुळे भाविक व नागरिकांना स्नान व हातपाय धुण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. पाणी कमी असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. मागील काही वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वरिष्ठ पातळीवर याची दखल देऊन घेऊन योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी भाविक व नागरिकांतून होऊ लागली आहे. Kolhapur News

यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होते. त्यामुळे नदीतील पाणीसाठा फेब्रुवारी महिन्यातच कमी झाला. पाणीसाठा कमी असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. नदीचे पाणी प्रवाहित नसल्याने पाण्याला हिरवा रंग आला आहे. निर्माल्याला डबे ठेवले असताना सुद्धा काही लोक नदीतच निर्माल्य टाकतात. त्यामुळे निर्माल्य व कचरा पाण्यातच साचून राहत आहे. दत्त मंदिरासमोरीच्या पात्रातील पिचिंगचे दगड दोन फूट पाण्यातच पायाला लागतात. त्यामुळे नदीत स्नान कसे करावे, हा प्रश्न भेडसावत आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूवरील घाटावर धार्मिक विधींसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून भाविक येतात. विधी झाल्यावर स्नान करण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. राजापूर बंधाऱ्याचे बॅक वॉटर शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठी असणाऱ्या काही गावांना मिळते. मात्र सध्या या बंधाऱ्यावरील नियोजन विस्कळीत झाले आहे, असे नागरिकांकडून सांगितले जात आहे. Kolhapur News

नदी काठावरील शेतकऱ्यांना ऊस व अन्य पिकांसाठी पाणी उपसा करण्यास अडचणी येत आहेत. उन्हाळ्याचे अजून तीन महिने बाकी असताना ही परिस्थिती भीषणावह आहे. व आणखी पाणी पातळी कमी झाल्यास शेती पंप बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. अद्याप उपसाबंदी करण्यात आली नसून याहून पाणी कमी झाल्यास उपसाबंदी करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे खात्यातील सूत्रांकडून मिळत आहे. बंधारे व धरणांतील पाण्याचे योग्य नियोजन करून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी भाविक व नागरिकांतून होत आहे.

पाणी कमी असल्याने नदीपात्रात बेसुमार मासेमारी सुरू आहे. मासेमारीसाठी गळ दूरवर फेकला जातो. त्यामुळे दत्त मंदिरासमोरच मासेमारी सुरू असल्याचे चित्र आहे. तसेच दक्षिण बाजूच्या घाटावरील निसटलेले दगड बसविण्याचे काम नूतन अध्यक्ष वैभव पुजारी, सचिव संजय पुजारी यांनी हाती घेतले आहे.

हेही वाचा 

Back to top button