कोल्हापूर : सादळे-मादळे परिसरात बिबट्याचा वावर | पुढारी

कोल्हापूर : सादळे-मादळे परिसरात बिबट्याचा वावर

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : सादळे मादळे (ता. करवीर) येथे सायंकाळी साडेनऊच्या सुमारास स्थानिकांना सादळे गावच्या जवळ बिबट्या वावरताना निदर्शनास आला.

याबाबत स्थानिक नागरिकांच्याकडून मिळालेली माहिती अशी, गुरूवारी रात्री साडे नऊच्या सुमारास किशोर कांबळे हे नातेवाइकांना घेऊन मोटर सायकलवरून मादळेकडे जात असताना सादळे गावच्या पुर्वेस डॉ. भुपाळी यांच्या फार्म हाऊसच्या समोरील रस्त्यावर बिबट्या आल्याचे दिसून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत चाचपडत आपली गाडी थांबवली इतक्यात काही क्षणात बिबट्या मागे वळून झाडीत निघुन गेला. काही दिवसांपूर्वी शिये तसेच जठारवाडी येथिल खडकुबाईचा माळ परिसरात बिबट्याचे दर्शन स्थानिक लोकांना झाले होते या परिसराला लागुन असलेल्या सादळे वनविभागाच्या हद्दीत टोप जोतिबा या मुख्य राज्य मार्गावरती गुरुवारी सायंकाळी बिबट्या नजरेस पडल्याने सादळे-मादळे, कासारवाडीसह परिसरात घबराट पसरली आहे. दोन वर्षांपूर्वी याच परिसरात बिबट्याचे काही काळ वास्तव्य होते. पुन्हा त्याच परिसरात गावालगत बिबट्याचा वावर दिसून आल्याने लोकांच्या मध्ये चिंता वाढली आहे. वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवास घालवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

Back to top button