कोल्हापूरी घोंगडी आणि सोलापुरी चादरीचे इटली, व्हिएतमानला आकर्षण | पुढारी

कोल्हापूरी घोंगडी आणि सोलापुरी चादरीचे इटली, व्हिएतमानला आकर्षण

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोल्हापूरी घोंगडी, सोलापुरची प्रसिद्ध चादर, त्यासोबतच सोलापुरात बांबूपासून तयार केलेले कपडे, टॉवेल, नॅपकिनने जगभरातील ग्राहकांना भुरळ घातली. सोलापुरी चादर, सोलापुरात बांबूपासून तयार होणारे विविध वस्त्रावरणे आणि कोल्हापूरची घोंगडी आता इटली, व्हिएतमान अशा देशात साता समुद्रापार जाणार आहे. दिल्लीत पार पडलेल्या जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवात सोलापूर, कोल्हापूरच्या उत्पादनांच्या जगभर मागणी असल्याचे ‘पुढारी’च्या निदर्शनास आले.

राजधानी दिल्लीत नुकताच जागतिक वस्त्रोद्योग महोत्सव पार पडला. या वस्त्रोद्योग महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे २८ दालने उभारण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूरात बांबूपासून तयार होणारी वस्त्रावरणे, सोलापुरी चादर, कोल्हापुरी घोंगडी या गोष्टींना देश-विदेशातील ग्राहकांनी आणि व्यापाऱ्यांनी पसंती दर्शवली. महाराष्ट्र राज्य शासनाचे हातमाग महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळ यांनी या उत्पादनासंबंधीचे दालने वस्त्रोद्योग महोत्सवात लावले होते. तसेच या महामंडळांच्या माध्यमातून बांबु वस्त्रोद्योगाशी संबंधित खाजगी संस्थांचे देखील दालने होते. देशाच्या सर्व राज्यातील ग्राहक आणि इतर देशातील ग्राहक, व्यापारी या ठिकाणी आले होते. ट्रायडेंट आणि वेल्सवन हे भारतातील आणि जगातील टॉवेल उत्पादन करणारे प्रमुख ब्रँड्स आहेत, त्यांनीही या गोष्टींसाठी उत्सुकता दाखवली आहे.

दरम्यान, यंत्रमाग महामंडळांतर्गत सोलापूरच्या बियोंड टेरी टॉवेलने या ठिकाणी स्टॉल लावला होता. बियोंड टेरी टॉवेल कपडे, टॉवेल, नॅपकिनचे उत्पादन घेते. यावेळी बियोंड टेरी टॉवेलचे संचालक गोविंद झंवर यांनी ‘पुढारी’शी संवाद साधला. गोविंद झंवर म्हणाले की, “देश विदेशातील व्यापाऱ्यांचा बांबूपासून तयार होणाऱ्या उत्पादनासंदर्भात करार करून त्यांच्या देशात व्यवसाय करण्याचा मानस आहे. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. ट्रायडेंट आणि वेल्सवन हे भारतातील दोन प्रमुख टॉवेल उत्पादन करणारे ब्रँड्स आहेत. त्यांनी देखील महाराष्ट्रात बांबूपासून तयार झालेल्या या सर्व उत्पादनांमध्ये विशेष रुची त्यांनी दाखवली आहे. जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवाच्या माध्यमातून सोलापुर शहरातील बांबूपासून तयार होणाऱ्या वस्त्रावरणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. स्थानिक कारागीरांच्या हातून तयार झालेले उत्पादनाला जागतिक बाजारात मागणी आहे, ही राज्यासाठी आणि देशासाठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे. सरकारचा हा चांगला उपक्रम आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारी, ग्राहक यामध्ये एकत्र आले. यामुळे सोलापूरातील उत्पादने देशात आणि जगात पोहोचत आहते. दरवर्षी अशी प्रदर्शने झाली पाहिजेत. तसेच सरकारद्वारे बांबु वस्त्रोद्योगासाठी संशोधन आणि विकास योजना, सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तसे झाल्यास बांबु वस्त्रोद्योग व्यवसायात मोठी क्रांती होऊ शकते.” असेही ते म्हणाले.

Back to top button