

'मेड इन चंदगड एमडी ड्रग्ज' प्रकरणातील मुख्य आरोपी वकील राजकुमार राजहंस व त्याचा केअरटेकर निखिल लोहार यांना घेऊन पोलिस पथक बुधवारी रवाना झाले. अटक झाल्यानंतर दोघांना अधिक तपासासाठी बुधवारी माणगाव-ताम्रपर्णी बंधार्यानजीक असलेल्या व बसर्गे येथील मृत सुधीर पाटील यांच्या पोल्ट्री शेडमध्ये नेऊन पोलिसांनी झाडाझडती घेतली. या ठिकाणी ड्रग्ज तयार करण्याचा कच्चा माल सापडला. याच घराला दिल्ली पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी सील ठोकले होते. मात्र याची कुणालाच कल्पना नव्हती.
बुधवारी दुसर्या दिवशीही ड्रग्ज फॅक्टरी तसेच आरोपींच्या घरी जाऊन पुन्हा तपासणी झाली. तपास अपूर्ण राहिल्याने पथक पुन्हा मुंबईला रवाना झाले. महत्त्वाचा क्ल्यू हाती लागला असून, याची अधिकृत माहिती मुंबईत दिली जाणार आहे. तपासाबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली.
बसर्गे येथील मृत सुधीर पाटील यांच्या मालकीचे पोल्ट्री शेड आहे. त्यांनी ते एकाला भाडेतत्त्वावर यामधील काही भाग दिला होता. सुधीर यांचे निधन झाल्यानंतर पोल्ट्री व्यवसाय बंद पडला होता. बुधवारी त्यांच्या कुटुंबीयांची पोलिसांनी कसून चौकशी केली. तालुक्यातील अन्य ठिकाणीही पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले.
दरम्यान, ढोलगरवाडी येथील फार्म हाऊसचा केअरटेकर निखिल लोहार व या प्रकरणाचा मास्टरमाईंड अॅड. राजकुमार राजहंस याला घेऊन पोलिसांनी पुन्हा एकदा मुंबई गाठली. आरोपींना घेऊन एमडी ड्रग्ज बनविण्यासंबंधी परिस्थितीजन्य पुरावे गोळा केल्याचे समजते. यामध्ये आरोपींविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, लोहार व राजहंस यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. ड्रग्जशी संबंधित तालुक्यात इतर ठिकाणी कनेक्शन आहे का? याचीही पोलिसांनी आज सखोल माहिती घेतली.
दोन वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी ड्रग्जप्रकरणी रॉकी याला ताब्यात घेतले होते. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे बसर्गे येथील सुधीर पाटील यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये छापा टाकला होता. या छाप्यात कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आला होता. आजही पोल्ट्रीवजा घर असलेला काही भाग सील करण्यात आला आहे. मात्र, तालुक्यातील कुणालाच याची कल्पना नाही.
दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध ठिकाणी तीन पथकांनी तपास चालवला. एका पथकाला माहिती मिळताच मुख्य पथक प्रमुखांना याची तत्काळ माहिती दिली जात होती. त्यामुळे जलद गतीने तपास झाला.
पोलिस राजकुमारला घेऊन सुधीरच्या पोल्ट्री फार्मवर गेले होते. दिल्ली पोलिसांनी दरवाजाच्या कुलपाला सील केले आहे. मात्र, दरवाजा न तोडता छताचे पत्रे काढून जप्त माल लंपास केल्याचे बुधवारी उघडकीस आले. या प्रकरणात हल्लारवाडी येथील व दाटे शाळेचा माजी मुख्याध्यापक अरुण गोरल व कामगार रामदास पाटील यांच्याही पोल्ट्रीत कसून चौकशी केली. या दोघांनाही मुंबईला पोलिस ठाण्यात येण्यास सांगितल्याचे समजते.
ड्रग्ज धंदा उघडकीस येईल या भीतीने अॅड. राजकुमारने जंगमहट्टी येथील प्रकल्पाजवळील जंगलात सुमारे 15 एकर जमीन खरेदी केल्याचे समजते. या ठिकाणची पथकाने पाहणी केली. ही जमीन नुकतीच खरेदी केली आहे. हा भाग दिवसाही निर्मनुष्य असतो. विकलेली जमीन कुणाची, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या दिवसापासून दै. 'पुढारी'च्या माध्यमातून सडेतोड, निर्भीड लिखाण केल्यामुळे तपासाला गती मिळाली. या प्रकरणातील इत्थंभूत माहिती 'पुढारी'ने निर्भीडपणे वाचकांपर्यंत पोहोचविल्यामुळे 'पुढारी'चे सर्वत्र कौतुक होत आहे.