मानेचे दुखणे, 'हे' उपाय केल्यास वेदना होतील कमी | पुढारी

मानेचे दुखणे, 'हे' उपाय केल्यास वेदना होतील कमी

हल्ली मानदुखीची समस्यांमध्ये वेगाने वाढ होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे नक्कीच महागात पडू शकते. कारण, मानदुखीच्या या वेदना गंभीर विकारांना आमंत्रण देऊ शकतात.

लक्षणे काय?

मानेच्या दुखण्याची काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात. ती ओळखली पाहिजे. मानेचे स्नायू कडक होणे आणि ते खेचले जाणे. मान प्रचंड दुखणे. एकाच स्थितीत दीर्घ काळ मान रोखून ठेवली, तर मानेच्या वेदना खूप जास्त वाढतात. जसे गाडी चालवणे किंवा कॉम्प्युटरवर काम करणे इत्यादी मध्ये मान एकाच स्थितीत राहिल्याने दुखते. हात, पाय आणि पंजा यांना मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा अशक्तपणा जाणवणे. डोक्याच्या मागच्या बाजूला वेदना होणे आणि खांद्यांमध्ये वेदना होणे. शरीराचे संतुलन राखणे आणि चालणे यामध्ये अडचणी येणे. स्नायू आखडणे, मूत्र विसर्जन आणि शौच विसर्जनावर नियंत्रण न राहणे.

वेदना होण्याची कारणे

कॉम्प्युटर आणि मोबाईलचा सतत वापर केल्याने स्नायू ताणले जाणे. वाचताना किंवा काम करताना मानेची स्थिती किंवा ठेवण योग्य नसणे. वाढत्या वयानुसार मानेचे सांधे निकामी होणे. ऑस्टियोआथ्रारायटिसमुळे मानेच्या हाडांना इजा होणे. इत्यादींमुळे मानेमध्ये वेदना होऊ लागतात. मानदुखी होत असल्यास त्यावर उपचार घेण्याची गरज असते. या वेदना कोणत्या पातळीवरील आहेत, त्यानुसार उपचार केले जातात. सर्व्हायकल पेन्स किंवा मानदुखीची समस्या किरकोळ असेल, तर जीवनशैलीत बदल करून त्या वेदनांचे व्यवस्थापन करता येते. परंतु, वेदना गंभीर स्वरूपाच्या असतील, तर ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. एक्सरे, सीटी स्कॅन आणि एमआरआय आदी चाचण्या करून या वेदनांचे निदान योग्य पद्धतीने अचूक होऊ शकते. मग, त्यावर योग्य उपचार करूनही या वेदना कमी करता येतात.

औषधे आणि लसी

नसांना इजा झाल्याने होणार्‍या वेदना, पेशींना येणारी सूज, स्नायू आखडणे हे सर्व कमी करण्यासाठी औषधोपचार केले जातात. वेदना कमी करण्यासाठी स्टेरॉईडची इंजेक्शने दिली जाऊ शकतात.

शस्त्रक्रिया

फिजिओथेरपी आणि औषधे यांचा वापर करूनही सर्व्हायकल पेन्स किंवा मानदुखी कमी होत नसेल किंवा बरी होत नसेल, तर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.

प्रतिबंध कसा?

बसताना, चालताना, कॉम्प्युटरवर काम करताना योग्य बैठक स्थितीत बसावे. नियमित व्यायाम करावा. मोबाईल फोनवर बोलताना तो कान आणि खांदे यांच्यामध्ये धरून बोलू नका. मोबाईल फोनचा अतिवापर टाळून गरजेपुरताच वापर करावा. हाडांचे आरोग्य राखण्यासाठी कॅल्शियम आणि डी जीवनसत्त्वाचे सेवन पुरेशा प्रमाणात करावे. झोपतानाही योग्य स्थितीत झोपावे.

फिजिओथेरपी

मानदुखीमध्ये फिजिओथेरपी घेता येते. त्याचा फायदाही होतो. मानेचे स्नायू कडक झालेले असतात. ते सोडवण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्या देखरेखीखाली काही विशेष व्यायाम करून घेतले जातात. मानेच्या वेदना दूर करण्यासाठी मान, पाठ कोणत्या स्थितीत असावी हे शिकवले जाते.

स्पायनल ट्युबरकलोसिस

मणक्याला इजा झाल्यास आणि हाडे मोडल्यास मणक्यामध्ये संसर्ग होतो. स्पायनल ट्युबरक्युलॉसिसमुळे एकापेक्षा अधिक मणक्यांच्या चकत्यांना इजा होते. मणक्यांच्या या चकत्यांमध्ये विकृती निर्माण झाल्याने मणक्यामध्ये विकृती निर्माण होते. स्पायनल ट्युबरक्युलोसिसमुळे मणक्यातील पोकळी अरुंद होते. त्यामुळे मज्जारज्जूशी संबंधित विकार निर्माण होतात. वेळीच यावर उपचार न केल्यास मणक्यातील मज्जारज्जू दबली गेल्यास शरीराचा कंबरेपासूनचा खालचा भाग सुन्न होतो किंवा कंबरेखालच्या भागाला लकवा होऊ शकतो.

मानदुखीच्या समस्येला वैद्यकीय भाषेत सर्व्हायकल पेन्स असे म्हटले जाते. मानेपासून मणक्याला जोडणारी सर्व्हायकल स्पाईन म्हणजे मणक्यातील नसांचे सांधे आणि चकत्या किंवा डिस्क यांच्यामध्ये समस्या निर्माण झाल्यास सर्व्हायकल पेन्स होतात. हाडांची आणि कार्टिलेज यांची मोडतोड किंवा नुकसान झाले, तर या वेदना होतात. वय वाढल्यानंतर इतरही कारणे मानदुखीसाठी कारणीभूत ठरतात. जसे मानेला इजा होणे, लिगामेंटस् किंवा स्नायुबंध कडक होणे, शारीरिक सक्रियता कमी होणे, अयोग्य स्थितीमध्ये मान दीर्घकाळ तशीच ठेवणे यामुळेही मानदुखी किंवा सर्व्हायकल पेन्स होऊ शकतात. काही व्यक्तींचा मानदुखीचा त्रास असह्य होतो. त्यामुळे रोजची कामे करण्यातही त्यांना त्रास
होतो.

मोबाईल आणि कॉम्प्युटर यांच्या प्रचलनामुळे तर यामध्ये भर पडली आहे. शरीराची स्थिती किंवा ठेवण योग्य नसेल, तर मानेचे स्नायू ताणले जातात. कॉम्प्युटरच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. कारण, सतत मान, पाठ झुकवून लोक काम करत असतात. त्यामुळे मानदुखी किंवा सर्व्हायकल पेन्स या मानेपर्यंत मर्यादित न राहता शरीराच्या दुसर्‍या भागांपर्यंत पसरतात.

Back to top button