Ram Mandir : ३.७८ लाख वेळा लिहीले ‘जय श्रीराम’; अडीच वर्षांपासून जप | पुढारी

Ram Mandir : ३.७८ लाख वेळा लिहीले ‘जय श्रीराम’; अडीच वर्षांपासून जप

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण जगात सध्या श्रीराम मंदिरातील भव्य दिव्य सोहळ्यासंदर्भात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असतानाच हुपरीतील दीपक दत्तात्रय पाटील व आशा दीपक पाटील यांच्या श्रीराम भक्तीचीही चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या पायाभरणी पासून गेली अडीच वर्षे आशा पाटील यांनी ‘जय श्रीराम’ असा जप वहीवर लिहून काढला आहे. आतापर्यंत 3 लाख 78 हजार वेळा हा जप पूर्ण झाला असून 22 जानेवारीपर्यंत 4 लाख जप पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

संबंधित बातम्या : 

हुपरी येथील जालिंदर पाटील गल्लीत राहणारे दीपक पाटील पैलवान आहेत. त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षापासून सायकल प्रवास करीत विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अयोध्येत सायकलीने जाऊन श्रीराम मंदिराचे दर्शन घेतले. सौ. आशा व दीपक यांचा पुत्र सचिन पाटील हा राष्ट्रीय पातळीवरील नामवंत मल्ल आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी श्रीराम मंदिराची पायाभरणी झाली. त्यावेळी सौ. आशा पाटील यांना जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी श्रीराम नामाचा जप वहीवर लिहून काढण्याचा संकल्प केला.

गेली अडीच वर्षे नित्यपणे त्या हा जप करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी 3 लाख 78 हजार वेळा जप लिहिला असून 22 जानेवारीपर्यंत 4 लाख जप पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांनी या कृतीतून श्रीरामाविषयी असलेली अनोख्या निस्सीम भक्तीची प्रचिती दिली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘श्रीराम’नामाच्या जपाने आत्मिक समाधान

आपण केलेला संकल्प पूर्ण होत आहे . श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. माझ्यासारख्या रामभक्तांचा आनंद अवर्णनीय आहे. यामुळे जे आत्मिक समाधान मिळाले तेही महत्त्वाचे असल्याचे सौ. आशा पाटील यांनी सांगितले. सायकलीवरून या वयात प्रवास करून विविध मंदिरांना भेटी देऊन आपल्याला समाधान मिळाले आणि यातून तरुण व वृद्ध या दोन्ही पिढ्यांना चांगला संदेश गेला, याचे समाधान लाभल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button