कोल्‍हापूर : आरे येथे गव्याच्या धडकेत मेंढपाळ जखमी | पुढारी

कोल्‍हापूर : आरे येथे गव्याच्या धडकेत मेंढपाळ जखमी

देवाळे : पुढारी वृत्तसेवा आरे (ता.करवीर) येथील मेंढपाळ तानाजी सूर्याप्पा रानगे हे बकरी चारण्यासाठी गेले होते. यावेळी गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरे (ता.करवीर) येथील मेंढपाळ तानाजी सूर्याप्पा रानगे हे सोमवारी दुपारी गावालगत कुंभारकी नावाच्या शेतामध्ये बकरी चारण्यासाठी गेले होते. यावेळी ऊसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात तानाजी यांच्या हाताला व पोटाला धडक मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी आरडाओरडा करून गव्याला हुसकावून लावले व तानाजी यांना उपचारासाठी सी. पी. आर. रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आरे, गाडेगोंडवाडी परिसरात गव्याचे दर्शन झाले असून, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

रात्री अपरात्री शेतकर्‍यांनी शेतात जाऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे. दरम्यान सहायक वनसंरक्षक मयुर शेळके, शैलेश शेवडे, वनरक्षक महादेव कुंभार यांनी रानगे कुटुंबियांची भेट घेऊन जागेचा पंचनामा केला.

हेही वाचा : 

Back to top button