कोल्हापुरात चोरी सत्र सुरूच; २७ तोळे दागिन्यांसह ५० हजार रूपये लंपास | पुढारी

कोल्हापुरात चोरी सत्र सुरूच; २७ तोळे दागिन्यांसह ५० हजार रूपये लंपास

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा

कोल्हापुरातील रायगड कॉलनी इथल्या कुलूपबंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष केलं. चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्यान घराची कुलूप आणि तिजोरी फोडून २७ तोळे वजनाचे सोन्या – चांदीचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये चोरून नेले. कोल्हापूरात धाडसी चोरी ची ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत संदीप फराकटे यांनी करवीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोल्हापुरातील रायगड कॉलनी इथं संदीप फराकटे हे पत्नी आणि मुलासह राहतात. त्यांचा कंट्रक्शनचा व्यवसाय आहे. पत्नी सोनाली या राहत्या घरी क्लासेस चालवतात. तर ९ वर्षाचा हर्षदीप हा मुलगा शालेय शिक्षण घेतो. २ दिवसांपूर्वी पती संदीप फराकटे हे कामानिमित्य बाहेरगावी गेले होते. घरी कोणीच नसल्याने आणि शनिवार, रविवार क्लासला सुट्टी असल्याने त्यांची पत्नी सोनाली या मुलासह शुक्रवारी दुपारी इचलकंजी इथल्या माहेरी गेल्या होत्या.

रविवारी रात्री ११ वाजता त्या घरी परतल्या. तेव्हा त्यांना घराच्या गेटला कुलूप नसल्याच जाणवले. तसेच घराच्या मुख्य दरवाज्याला बाहेरून कड्या घातल्याचे दिसले. घाबरून त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, बेडरूममधील दोन पैकी एक तिजोरी कटावणीच्या सहाय्याने फोडल्याचं आढळले. तसंच तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून बेडवर टाकल होतं.

सोन्या – चांदीचे दागिने असलेला डबा तिजोरीत दिसून आला नाही. या डब्यात अर्धा किलो चांदी तसेच सोन्याचे दागिने असा साडे सत्तावीस तोळ्याचा ऐवज आणि रोख ५० हजार रुपये चोरीला गेल्याचं लक्षात आलं. याबाबत त्यांनी आपल्या पतीला कळवलं. रात्री करवीर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून रीतसर पंचनामा केला.

याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज दिवसभर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीरच्या पोलिस उपअअधीक्षकांच्या पथकानं परिसरात चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरात धाडसी चोरी झाल्यानं नागरिकांत भितीचं वातावरण पसरलं आहे.

हे ही पहा :

Back to top button