Kolhapur : १३ वर्षांपासून रोखलेला किणे-पोश्रातवाडी रस्ता न्यायालयाच्या आदेशानंतर केला खुला

Kolhapur : १३ वर्षांपासून रोखलेला किणे-पोश्रातवाडी रस्ता न्यायालयाच्या आदेशानंतर केला खुला

आजरा; पुढारी वृत्तसेवा : आजरा तालुक्यातील किणे-पोश्रातवाडीचा गेली १३ वर्षे प्रलंबीत असलेला २५० मीटरचा रस्ता खुला करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार आजरा तहसिलदार समीर माने यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याची कार्यवाही केली.

याबाबत अधिक माहीती अशी की, पंधरा वर्षापूर्वी किणे-पोश्रातवाडी ग्रामीण मार्ग ६६ या ग्रामीण रस्त्याची नोंद आहे. यासाठी काही निधी मंजूर झाला. यावर दोन लाख रुपये खर्चही झाले होते. काही शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम रोखल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले होते.
मुंबई उच्च न्यायालयात याबाबत अरूण नारायण पाटील व अन्य दोघांनी याचिका दाखल करून दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने रस्ता खुला करण्याचे आदेश आजरा तहसीलदारांना दिले होते. महिनाभरात रस्ता खुला करण्याचा निकाल दिला होता. त्यानुसार आज महसूल प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यवाही केली. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य केल्याने कार्यवाही शांततेत पार पडली.
तहसीलदार माने यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाच्या निकालाप्रमाणे हद्दी निश्चित करून मार्ग करण्यात आला आहे. जेसीबीच्या सह्याने रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. या रस्त्यामुळे किणे – पोश्रातवाडी अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर कोळिंदे, नेसरी ही गावे जोडली जाणार आहेत.

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता सूर्यकांत नाईक, पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे, मंडल अधिकारी संदिप कुरणे, तलाठी प्रविण परीट यांनी कार्यवाहीमध्ये सहभाग घेतला. यावेळी माजी सभापती विष्णूपंत केसरकर, किणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय केसरकर, माजी सरपंच जयवंत सुतार, ग्रामसेवक कविता कोकीतकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news