संभाजीराजेंच्या वक्तव्याने आघाडीत स्पर्धा | पुढारी

संभाजीराजेंच्या वक्तव्याने आघाडीत स्पर्धा

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून खासदार असलेले सदाशिवराव मंडलिक यांचे शरद पवार यांच्याशी बिनसल्यानंतर त्यांनी वेगळी वाट पकडली. पक्षाला रामराम केला. स्वतंत्रपणे लोकसभा लढवण्यासाठी शड्डू ठोकला. त्यांना रोखण्यासाठी शरद पवार यांनी थेट राजवाड्यालाच गार्‍हाणे घालत संभाजीराजे यांना मैदानात उतरवले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत संभाजीराजे यांचा पराभव झाला आणि लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचे धाडस करणार्‍या मंडलिक यांच्या गळ्यात जनतेने विजयाची माळ घातली. पराभवाचा हा सल खोडून काढण्यासाठी मंडलिकांच्या मुलालाच लोकसभेच्या आखाड्यात धूळ चारण्याची तयारी संभाजीराजे करत आहेत.

गेले काही दिवस कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची चर्चा होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर व्ही. बी. पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडेच पाहिले जाते. सदाशिवराव मंडलिक यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला तेव्हा ते राष्ट्रवादीचे सदस्य होते. या न्यायाने राष्ट्रवादीने कोल्हापूरच्या जागेवर आपला दावा सांगितला. मात्र अपक्ष निवडून आलेल्या मंडलिक यांनी निवडून येताच काँग्रेसला पाठिंबा दिला. त्याचा आधार घेत काँग्रेसनेही या जागेवर दावा सांगितला आहे. जागेवरील हे दावे-प्रतिदावे अद्याप स्थानिक पातळीवर आहेत. त्याचा निर्णय राज्य पातळीवरील जागा वाटप बैठकीत होईल.

व्ही. बी. पाटील यांची चर्चा सुरू असतानाच अचानकपणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत आमचा सरप्राईज उमेदवार असेल असेही स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर संभाव्य उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली. याचवेळी संभाजीराजे यांनी गेल्या लोकसभेतील जखम आजून विसरलेलो नाही असे विधान करत कोल्हापूर, नाशिक किंवा संभाजीनगर यापैकी काही ठरले नसले तरी लोकसभा निवडणूक लढवणार असे संकेत दिले. त्यामुळे सतेज पाटील यांचे विधान आणि संभाजीराजे यांचा दावा याचा धागा जोडला जात आहे. संभाजीराजे यांची स्वराज्य ही स्वतंत्र संघटना आहे. त्यांचे स्वतंत्र मेळावे होत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या संघटनेने महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहेत.

संभाजीराजे यांच्या विधानामुळे ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा चर्चेत आले आहेत. गेले काही महिने संभाजीराजे यांनी नाशिक आणि संभाजीनगर येथे लक्ष केंद्रीत केले होते. त्यापार्श्वभूमीवर ते नाशिकमधून लढणार अशी चर्चा सुरू होती. या सर्व चर्चेला पूर्णविराम देण्याची तयारी करत असल्याचे संभाजीराजे यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.

संजय मंडलिक हे शिवसेना भाजपचे उमेदवार होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा पराभव केला. त्यावेळी सतेज पाटील यांनी त्यांचे आणि महाडिक यांचे असलेले राजकीय वैर आमचं ठरलय अशी टॅगलाईन घेत सुरू ठेवले. त्याचा फटका महाडिक यांना बसला. संजय मंडलिक आता शिंदे गटाचे खासदार आहेत. तर महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केले आणि ते राज्यसभेचे खासदार आहेत. मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ते पालकमंत्री झालेत. मुश्रीफ, महाडिक आणि मंडलिक हे आता महायुतीचे नेते आहेत. संभाजीराजे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्यास सतेज पाटील, पी.एन. पाटील, के.पी. पाटील, यांची मदत त्यांना मिळेल. स्वाभिमानी शेतकरी संघटना जर महाविकास आघाडीचा घटक झाली तर, ग्रामीन भागातील त्यांची मोठी ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे उभी राहील.

या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. राष्ट्रवादीला जागा मिळाली तर व्ही. बी. पाटील उमेदवार असतील. मात्र काँग्रेसला जागा मिळाली तर संभाजीराजे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे.

सध्याचे बलाबल

कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार आहेत. कागल व चंदगड राष्ट्रवादी अजित पवार गट, राधानगरी, भुदरगड शिवसेना शिंदे गट असे कोल्हापूर मतदारसंघात पक्षीय बलाबल आहे.

कोल्हापूरसाठी रस्सीखेच

कोल्हापूरवर प्रत्येक पक्षाला आपला दावा सांगावासा वाटतो. शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप या सर्व पक्षांची कोल्हापूरसाठी आग्रही मागणी आहे. ही जागा महाविकास आघाडी की महायुतीतील घटक पक्षाला मिळणार हाच चर्चेचा विषय आहे. भाजपने कोल्हापूरची जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मते 2009

सदाशिवराव मंडलिक
चंदगड : 68433
कागल : 99513
करवीर : 68622
कोल्हापूर उत्तर : 35056
कोल्हापूर दक्षिण : 48334
राधानगरी : 106729

संभाजीराजे
चंदगड : 76,129
कागल : 81245
करवीर : 65385
कोल्हापूर उत्तर : 53369
कोल्हापूर दक्षिण : 41939
राधानगरी : 64400

विधानसभा मतदारसंघनिहाय मते 2019

संजय मंडलिक
चंदगड : 120857
कागल : 148727
करवीर : 120864
कोल्हापूर उत्तर : 101892
कोल्हापूर दक्षिण : 127175
राधानगरी :126160

धनंजय महाडिक
चंदगड : 70726
कागल : 77300
करवीर :84054
कोल्हापूर उत्तर : 74237
कोल्हापूर दक्षिण : 83558
राधानगरी : 86945

Back to top button