कोल्हापूर : एक लाखाला 3 लाखांच्या बनावट नोटा; आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश | पुढारी

कोल्हापूर : एक लाखाला 3 लाखांच्या बनावट नोटा; आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लाखाला तीन लाख दराच्या नोटांची छपाई करून देण्याच्या बहाण्याने महाराष्ट्र-कर्नाटकसह अन्य राज्यांतील उद्योग-व्यावसायिकांना गंडा घालणार्‍या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्यासह तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी पहाटे बेड्या ठोकल्या. पथकाने बेलवळे खुर्द (ता. कागल) येथील म्होरक्या अशोक बापू पाटील याच्या फार्महाऊसवर छापा टाकून टोळीच्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला.

सूत्रधार अशोक पाटील (वय 51, रा. बेलवळे खुर्द, कागल), मेहरूम अल्ताफ सरकवास (41), सलील रफीक सय्यद (30, रा. दोघेही रा. घटप्रभा, जि. बेळगाव) अशी मुसक्या आवळलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांकडून 1 लाखाची रोकड, नोटा छपाईची मशिनरी, कोरे कागदाचे गठ्ठे असा 1 लाख 53 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

टोळीचा म्होरक्या अशोक पाटील हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा तालुकाप्रमुख असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तिप्पट नोटांची छपाई करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणार्‍या टोळीमध्ये सीमाभागातील सराईत गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असाव्यात, असा संशयही तपासाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. लवकरच संशयितांचा छडा लावून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टोळीच्या कारनाम्यांची होणार सखोल चौकशी

तिप्पट नोटांची छपाई करून देण्याच्या बहाण्याने टोळीने आजवर किती जणांची फसवणूक केली, किती काळापासून टोळीच्या फसवेगिरीचा प्रकार सुरू आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. टोळीकडून फसवणूक झालेल्या उद्योग-व्यावसायिकांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कळमकर यांनी केले आहे. म्होरक्यासह अन्य संशयितांविरुद्ध कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गरजू व्यावसायिकाची माहिती काढून लावला सापळा!

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथील व्यावसायिक उमेश तुकाराम शेळके (रा. नम—ता सोसायटी, रेल्वे स्टेशनजवळ) हे आर्थिक मंदीमुळे काही काळापासून कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे वसुलीसाठी विविध बँकांचा त्यांच्याकडे तगादा लागला आहे. शेळके आर्थिक विवंचनेमध्ये असल्याची माहिती टोळीतील संशयित महिला मेहरूम अल्ताफ सरकवासला लागली.

बनावट नोटा छपाईच्या चित्रीकरणाची दाखविली फीत!

संशयित महिलेसह टोळीतील साथीदारांनी शेळके यांची भेट घेऊन त्यांना कर्जातून मुक्त करण्याची योजना सांगितली. लाखाला तीन लाख किमतीच्या हुबेहूब नोटांची छपाई करून देण्याची टोळीने सारी तांत्रिक माहिती दाखविली. बनावट नोटांच्या छपाईचे चित्रीकरणही त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादनाचा प्रयत्न केला.

बेलवळे खुर्दला लावला सापळा

शेळके यांना खात्री पटल्यानंतर त्यांनीही टोळीच्या प्रस्तावाला होकार दिला. त्यामुळे संशयितांनी शेळके यांना एक लाखाच्या चलनी नोटा घेऊन कोल्हापूरला येण्यास सूचना केली. शेळके पत्नीसमवेत रविवारी रात्री कोल्हापुरात आले. संशयित मेहरूम सरकवास यांनी शेळके यांची भेट घेऊन दाम्पत्याला बेलवळे खुर्द येथील अशोक पाटील यांच्या फार्महाऊस येथे नेले.

बंडलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन चलनी नोटा!

व्यावसायिकाकडून 1 लाखाची रोकड घेऊन त्याबदल्यात संशयितांनी 500 रुपये दराच्या नोटांचे 6 बंडल त्याच्या हातावर ठेवले. प्रत्येक बंडलाच्या दोन्ही बाजूला 500 रुपये दराच्या नोटा लावण्यात आल्या होत्या. त्याखाली कोर्‍या कागदांचे बंडल लावण्यात आले होते.

पोलिस अधीक्षकांचे तत्काळ छापा कारवाईचे निर्देश

दरम्यान, फसवणुकीच्या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली. त्यांनी तातडीने ‘एलसीबी’चे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सापळा लावून कारवाईचे निर्देश दिले. पथकाने पहाटेला छापा टाकून म्होरक्यासह तिघांना ताब्यात घेतले. रोख रकमेसह दीड लाखाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

संशयास्पद वस्तू, नोटांच्या आकाराचे कोरे बंडल हस्तगत

कारवाईत होल्ट अँड अ‍ॅम्प मीटरचा मशिन बॉक्स, काचेच्या पट्ट्या, चिकट टेप, लिक्विड असलेल्या बरण्या, नोटांच्या आकाराचे कोरे कागद, लहान आकाराचा कटर, असे साहित्यही पोलिसांना आढळून आले. सर्व संशयास्पद वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत, असेही कळमकर यांनी सांगितले. कारवाईत सहायक निरीक्षक सागर वाघ, संजय पडवळ, हिंदुराव केसरे, समीर कांबळे, तुकाराम राजगिरे, ओंकार परब, सुप्रिया कात्रट आदींचा सहभाग होता.

Back to top button