कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : हातकणंगले तालुक्याचे मतदान निर्णायक

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : हातकणंगले तालुक्याचे मतदान निर्णायक

विधान परिषद निवडणुकीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांची काटाजोड लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीमध्ये 416 मतदानापैकी सुमारे 139 मतदान फक्त एकट्या हातकणंगले तालुक्यात आहे.

इचलकरंजीचे आ. प्रकाश आवाडे यांनी अमल महाडिक यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे मताधिक्य वाढण्याचे संकेत मिळत आहेत. आ. महादेवराव महाडिक यांचे तालुक्यावर प्राबल्य असल्यामुळे जास्तीत जास्त मतदान अमल महाडिक यांना मिळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ही सतेज पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

हातकणंगले तालुक्यामध्ये 11 जिल्हा परिषद सदस्य आहेत. तसेच 1 पंचायत समिती सभापती आहेत. यापैकी जनसुराज्य 2, शेतकरी संघटना 1, भाजप 5 तसेच आवाडे गट 2, शिवसेना 1 व सभापती हा जनसुराज्य पक्षाचा आहे. तसेच हातकणंगले नगर परिषदेमध्ये एकूण 18 नगरसेवक आहेत.

यापैकी 6 महाडिक गटाचे मानले जातात. तर 12 सदस्य सतेज पाटील यांच्याबरोबर राहतील असे मानले जाते. हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली जि.प. सदस्यांसह 18 मतदारांचे संख्याबळ भाजप व ताराराणी आघाडीकडे आहे. हुपरी नगरपालिकेत सध्या भाजप व ताराराणी आघाडीची सत्ता आहे.

भाजपच्या सौ.जयश्री गाट या नगराध्यक्ष आहेत. याठिकाणी भाजपचे 9, ताराराणी आघाडीचे 6 शिवसेना 2, ग्रामदैवत श्री अंबाबाई विकास आघाडी 2 व अपक्ष 2 असे बलाबल आहे. हुपरी जि.प. मतदार संघात भाजपच्या सौ. शेंडुरे या कार्यरत आहेत. हुपरी परिसरात भाजप, ताराराणी आघाडीची बाजू भक्कम आहे. तसेच पेठवडगाव नगरपालिकेमध्ये 16 युवक क्रांती महाआघाडी व 4 यादव पॅनेल आघाडी असे 20 सदस्य आहेत. यापैकी 16 महाडिक गट तर 4 सतेज पाटील यांच्याकडे मतदान होण्याची शक्यता आहे.

इचलकरंजी नगरपालिकेमध्ये एकूण सध्या नगराध्यक्षांसह 68 नगरसेवक मतदानासाठी पात्र आहेत. यापैकी भाजपचे 16 व आवाडे गटाचे 14 नगरसेवक आहेत. त्याचबरोबर 3 नवीन नगरसेवक सध्या आवाडे यांच्या तंबूत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आवाडे गटाने विधानपरिषदसाठी मजबूत फिल्डींग लावली असल्याचे दिसून येत आहे.

हातकणंगले तालुका जि.प. व पं.स. बलाबल

जिल्हा परिषद सदस्य 11 पंचायत सभापती 1
जनसुराज्य 2
शेतकरी संघटना 1
भाजप 5
आवाडे ताराराणी 2
शिवसेना 1
जनसुराज्य सभापती 1
हातकणंगले नगर परिषद
एकूण 18 नगरसेवक
महाडिक गट 6
सतेज पाटील गट 13
पेठवडगाव नगरपालिका 20 सदस्य
युवक क्रांती आघाडी 16
यादव पॅनेल आघाडी 4
हुपरी नगरपालिका
भाजप 9
ताराराणी (आवाडे गट) 6
शिवसेना 2
ग्रामदैवत अंबाबाई आघाडी 2
अपक्ष 2

पाहा व्हिडिओ : मृण्मयी गोडबोलेचा क्रश सचिन खेडेकर सर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news