शिरोळ : उमळवाडचे सरपंच गोरखनाथ चव्हाण अपात्र, जिल्हाधिकार्‍यांचा आदेश | पुढारी

शिरोळ : उमळवाडचे सरपंच गोरखनाथ चव्हाण अपात्र, जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : उमळवाड (ता. शिरोळ) येथील शिवसेनेचे लोकनियुक्त सरपंच गोरखनाथ चव्हाण यांचे पद रद्द झाल्याचा आदेश पारित झाला आहे. चव्हाण यांचे अतिक्रमणच्या जागेत घर असल्याची तक्रार सुहास तिवडे यांनी जिल्हाधिकार्‍याकडे केली होती. त्यानुसार सरपंच चव्हाण यांचे पद अपात्र ठरविण्यात आले. जिल्हाधिकार्‍याच्या आदेशानंतर चव्हाण यांच्या विरोधकांनी उमळवाडमध्ये फटाक्याची अतिषबाजी व गुलालाची उधळण केली.

उमळवाड येथे 2017 साली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक झाली होती. यात लोकनियुक्त सरपंच म्हणून आर.वाय. कांबळे निवडून आले होते. दरम्यान, सरपंच कांबळे यांचे निधन झाल्याने सन 2019 मध्ये झालेल्या पोटनिवणुकीत शिवसेनेचे गोरखनाथ चव्हाण हे लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात लढलेले पराभूत उमेदवार सुहास तिवडे यांनी सरपंच चव्हाण यांच्या अतिक्रमाणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे 28 जानेवारी 2020 रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारी अर्जाची सुनावणी होऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सरपंच चव्हाण यांना अपात्र ठरविल्याचे आदेश दिला आहे.

याबाबत अपात्र सरपंच चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, या निर्णयावर विभागीय आयुक्ताकडे अपिल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सरपंच अपात्र झाल्याचे उमळवाडमध्ये कळताच गावातील चौकात विरोधकांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, या निकालाने तालुक्यातील अनेक गावात अतिक्रमणीत ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांचे दाबे दणाणले आहेत. शिवाय या निकालामुळे अन्य गावातील ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधकांच्या हालचाली चालू झाल्या आहेत.

Back to top button