वडणगे; पुढारी वृत्तसेवा: मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या हंगामासाठी पहिली उचल ३५०० रुपये मिळावे, यासाठी वडणगे (ता.करवीर) येथील शेतकऱ्यांनी खर्डा भाकरी खाऊन आज (दि.१२) दिवाळी साजरी केली. तसेच जयसिंगपूर येथे गेल्या पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन करत असलेल्या राजू शेट्टी यांच्या आंदोलनालाही वडणगेतील शेतकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला.
गतवर्षीचा ऊसाचा दुसरा हप्ता व यंदाच्या हंगामासाठी पहिल्या उचलीच्या प्रश्नावर अद्याप तोडगा न निघाल्याने जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे सलग पाचव्या दिवशी ठिय्या जयसिंगपूर येथे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. वडणगे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना व रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व कारखानदारांचे या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी ऐन दिवाळी दिवशी खर्डा भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ऊसदर व इतर मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी वडणगे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू पोवार, सचिन पाटील, अरुण पाटील, सज्जन पाटील, निगवे दुमालाचे बाळासो रानगे तसेच रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेचे श्रीकांत घाटगे, बाळासो मिरजे, शंकर व्हरगे, सर्जेराव देवणे, यांच्यासह माजी सरपंच सचिन चौगले, बाजीराव पाटील, सेवा संस्थेचे सभापती सुनील माने ,संचालक बी.आर.पाटील, उमेश पाटील, निवास चौगले, वाय. के. चौगले, जोतिराम घोडके, दादासो शेलार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.