सरूड : पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर कारखाना अधिकाऱ्यांना खर्डा-भाकरीची शिदोरी देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. शाहूवाडी तालुक्यातील अथणी शुगर (युनिट-२) सोनवडे-बांबवडे तसेच शिराळा तालुक्यातील विश्वास साखर चिखली, दालमिया शुगर करुंगळे-आरळा या साखर कारखान्यांच्या प्रवेशद्वारात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो ऊसकरी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. (Swabhimani Shetkari Sanghatana protest)
२२ व्या ऊस परिषदेच्या निमित्ताने शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात जयसिंगपूर येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या गत गळीत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये त्वरित द्या, तसेच शेतकऱ्यांना यंदाची पहिली उचल विनाकपात ३ हजार ५०० रुपये द्या, या प्रमुख ठरावाची कारखाना प्रशासनाला शेतकऱ्यांनी आठवण करून दिली. (Swabhimani Shetkari Sanghatana protest)
यंदाही शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नसेल तर मी दिवाळीला घरी जाणार नाही. विक्रमसिंह मैदानावर दिवाळी होईल, या जाहीर घोषणेप्रमाणे राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. कारखान्यांचे चेअरमन, पदाधिकारी, अधिकारी यांना धनत्रयोदशी, दिवाळी, पाडवा, भाऊबीज या प्रमुख चार दिवशी खर्डा-भाकरीची शिदोरी देऊन दिवाळी साजरी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. यालाच अनुसरून अथणी शुगर सोनवडे-बांबवडे युनिटचे चिफ इंजिनिअर मारुती पाटील, विश्वास साखर चिखलीचे एमडी अमोल पाटील, दालमिया शुगर करुंगळे-आरळा प्रशासन अधिकाऱ्यांना खर्डा-भाकरीची शिदोरी देण्यात आली.
याचवेळी शाहूवाडी आणि शिराळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह सहभागी शेतकऱ्यांनी कारखान्यांच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारून खर्डा-भाकरी खाऊन आत्मक्लेश केला. बांबवडे कारखाना गेटवर शाहूवाडी चे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी शाहूवाडी तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, शिराळा तालुकाध्यक्ष मानसिंग पाटील, वसंत पाटील, राम पाटील, जयसिंग पाटील, भैय्या थोरात, अजित साळोखे, रामभाऊ लाड, दादासो पाटील, रवी पाटील, विजय पाटील, पद्मसिंह पाटील, शिवलिंग शेटे, प्रकाश पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा