विशाळगड , सुभाष पाटील : शाहुवाडी तहसील कार्यालयाकडून कुणबीच्या जुन्या नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून सहा सर्कल विभागासह तीन तज्ज्ञ मोडीवाचकांच्या सहाय्याने हे काम सुरु आहे. मंगळवार (दि. ७) पासून ही मोहीम सुरु असून तालुक्यात आज (दि.९) अखेर ३ हजार ६६२ कुणबी नोंदी सापडल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर सरकार आता वेगाने कामाला लागलं आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरीय कुणबी नोंदी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून शाहूवाडी तालुक्यात देखील मंगळवारपासून ही सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी १०४, दुसऱ्या दिवशी ४९५ तर तिसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ९) रोजी ३ हजार ६३ कुणबीच्या नोंदी आढळल्या. यावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी योग्य नियोजन करुन सदर नोंदी शोधताना योग्य काळजी व खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
मोडी तज्ञ प्रा. वसंत सिंघण, अमर पाटील, श्रीधर पाटील यांनी मोडीतील नोंदी शोधण्यासाठी सहकार्य केले. यावेळी निवासी तहसीलदार गणेश लवे, महसुल नायब तहसिलदार रवींद्र मोरे उपस्थित होते. नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुणबी नोंदीला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे. दरम्यान, जेवढ्या जास्ती-जास्त नोंदी मिळणार आहेत, तेवढ्या प्रमाणात कुणबी दाखले देण्यास मदत होणार आहे. ही मोहीम सरकारची पुढील सूचना येईपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत तालुका पातळीवर विविध विभागांतर्गत कुणबी नोंदीचा शोध घेतला जात आहे.