…तर कारखानदारांना दिवाळी साजरी करू देणार नाही : स्वाभिमानीचा इशारा | पुढारी

...तर कारखानदारांना दिवाळी साजरी करू देणार नाही : स्वाभिमानीचा इशारा

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करू दिली नाही, तर आम्ही सुद्धा कारखानदारांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही. त्यांना या दिवाळीत खर्डा भाकरी खायला लावून यावर्षीच्या ऊसाला ३५०० रुपये दर आणि मागील वर्षीचे ४०० रुपये घेतल्याशिवाय उसाचे कांड सुद्धा तोडू देणार नाही, असा सज्जड दम देत कारखानदारांनी साखर कारखाना सुरू केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजित पोवार यांनी दिला.

मुदाळ (ता. भुदरगड) येथे बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांच्या निवासस्थानी खर्डा भाकरी देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

के. पी. पाटील बाहेर गावी असल्याने त्यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांना खर्डा भाकरी देण्यात आली. स्वाभिमानीच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दर आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा यावेळी दिल्या. यावेळी अजित पोवार म्हणाले की, “मागील वर्षीच्या उसाला ४०० रुपये आणि या वर्षीच्या उसाला ३५०० रुपये दर दिल्याशिवाय आम्ही साखर कारखाना सुरू करू देणार नाही. आमचे नेते ऊस दरासाठी ऐन दिवाळीत आंदोलन करत आहेत. साखर कारखानदार शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करू देत नसतील तर आम्हीही कारखानदारांना आणि कारखाना प्रशासनाला दिवाळी साजरी करू देणार नाही. त्यांना या दिवाळीत खर्डा भाकर खायला घालून आमचे आंदोलन उग्र करणार आहे.”

यावेळी रणजितसिंह पाटील म्हणाले, आम्हीही शेतकऱ्यांची पोर आहोत. आम्हालाही शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, असे वाटतं आहे. इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत आम्ही अधिक दर दिला आहे. मागील वर्षी आम्ही इतर साखर कारखान्याच्या तुलनेत १८ कोटी रुपये अधिक दर दिला असुन गळीत हंगाम लांबला तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी तुम्ही आम्हाला हंगाम सुरू करण्यासाठी सहकार्य करा. तुमच्या भावना आम्ही चेअरमन के. पी. पाटील यांच्यापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी संजय देसाई, आनंदा पाटील, नामदेव भराडे, पंडित पाटील, संभाजी पाटील, आनंदा घारे, अशोक शेंडगे, अशोक पाटील, संतोष बुटाले, भागोजी कांबळे आदी. उपस्थित होते.

हही वाचा : 

Back to top button