Hasan mushrif : मराठा आरक्षण बैठकीत मंत्री एकमेकांवर धावून गेलेच नाहीत; राऊंतांच्या टीकेला मुश्रीफांचे उत्तर | पुढारी

Hasan mushrif : मराठा आरक्षण बैठकीत मंत्री एकमेकांवर धावून गेलेच नाहीत; राऊंतांच्या टीकेला मुश्रीफांचे उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणप्रश्नी आयोजित बैठकीत मंत्री एकमेकांवर धावून गेलेच नाही, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे या संदर्भात गैरसमज करू नये, असे उत्तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून कॅबिनेट मंत्री एकमेकांवर धावून जात आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण बिघडले असल्याचा आरोप राऊत यांनी करत, सरकारवर हल्लाबोल केला. याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. ते मुंबईतून माध्यमांशी बोलत होते. (Hasan mushrif)

पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मराठा आरक्षण देण्याची सर्वाचीच मागणी आहे. या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असून, न्यायालयीन बाबतीतही सरकारने मराठा आरक्षण प्रश्नावर जोर लावला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटालाच मिळेल असा दावादेखील हसन मुश्रीफ यांनी केला. (Hasan mushrif)

मराठा आरक्षणावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर – संजय राऊत

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि छगन भुजबळ हे दोन्ही कॅबिनेटमंत्री आमने-सामने आले आहे आहेत. यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू आहे. महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून कॅबिनेट मंत्री एकमेकांवर धावून जात आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकाराने संपूर्ण वातावरण बिघडले आहे. आरक्षणावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू असून, मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून राज्यात जातीपातीचं विभाजन सुरू असून, राज्यात कमजोर सरकार कार्यरत आहे, असे देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषददरम्यान आज (दि.९) बोलताना त्यांना सरकारवर निशाणा साधला होता. (Hasan mushrif)

हेही वाचा:

 

Back to top button