

दोनवडे : पुढारी वृत्तसेवा, माझ्या बायकोला त्रास देऊ नका, असा व्हॉईस मेसेज करून भोगावती नदीत पाचगावच्या तरुणाने जीवन संपवले. बुधवारी बालिंगे (ता. करवीर) येथील संतोष गाडगीळ याचा रिव्हज पुलानजीक त्याचा मृतदेह आढळून आला. संतोष बाळासाहेब गाडगीळ (वय २५, रा. पाचगाव, ता. करवीर) असे तरुणाचे नाव आहे. (Kolhapur)
मंगळवारी सायंकाळी संतोष गाडगीळ याने फॅमिली ग्रुप व मित्रांच्या ग्रुपवर मेसेज करत मी जीवन संपवत असल्याचे सांगितले. माझ्या बायकोला त्रास देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी या मेसेजमध्ये केली होती. नातेवाईक, मित्रमंडळींना मोबाईल ट्रॅकिंगच्या माध्यमातून संतोष बालिंगे येथील भोगावती पुलाजवळ असल्याचे समजले. त्यामुळे ही मंडळी भोगावती पुलावर आली. पुलावर संतोष याची दुचाकी दिसली नाही. आसपास शोध घेतला असता दोनवडे येथे वाटेवर दुचाकी व मोबाईल सापडला. रात्री अकरा वाजेपर्यंत बॅटरीचा आधार घेत नातेवाईक व मित्रमंडळी संतोषचा भोगावती नदी पात्राच्या आसपास शोध घेत होते. अंधार असल्यामुळे रात्री उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली. बुधवारी सकाळी होडीने शोधाशोध केली असता संतोषचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांना आढळला.
संतोष याची बायको गरोदर आहे. ती दवाखान्यात अॅडमिट आहे. दवाखान्यात दिवसभर थांबल्यानंतर संतोष घरी जातो म्हणून बाहेर पडला होता. पण, घरी न जाता त्याने भोगावती नदीत उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे पाचगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा