नाशिक : मालेगावमध्ये परराज्यातील मद्यसाठ्यासह ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त; उत्पादन शुल्कच्या पथकाची कारवाई | पुढारी

नाशिक : मालेगावमध्ये परराज्यातील मद्यसाठ्यासह ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त; उत्पादन शुल्कच्या पथकाची कारवाई

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.6) मुंबई-आग्रा महामार्गावर केलेल्या कारवाईत बेकायदेशीर मद्यसाठ्यासह 94 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सौंदाणे शिवारातील हॉटेल तुळजाई समोर ही कारवाई झाली. याप्रकरणी मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व वाहनमालकासह अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

मालेगावच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून वाहन तपासणी केली. आयशर कंपनीच्या सहाचाकी मालवाहू वाहनाची (जीजे 35 टी 3538) तपासणी केली असता त्यात गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेला परराज्यातील मद्यसाठा मिळून आला. वाहनासह 900 बॉक्स विदेशी मद्य व बियरचा साठा असा एकूण 94 लाख 24 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. वाहनचालक कमलेश भारमल राम यास अटक झाली असून मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व जप्त वाहनमालक यांचा शोध घेतला जात आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दशरथ जगताप, दुय्यम निरीक्षक हर्षराज इंगळे, पंढरीनाथ कडभाने, येवला विभागाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे, दुय्यम निरीक्षक एस. आर. वाकचौरे, पी. आर. मंडलीक, सहायक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे, अवधुत पाटील आदींचा पथकात समावेश होता. पुढील तपास निरीक्षक दशरथ जगताप करीत आहेत.

अवैध मद्यसाखळविरोधात प्रशासनाने मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत कुणालाही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीसंदर्भात माहिती मिळाल्यास विभागाच्या 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 8422001133 या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधावा, माहितीगाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button