ग्रामपंचायत निवडणूक : आजरा तालुक्यात सहा ठिकाणी सत्ताधारी, तीन ठिकाणी सत्तांतर | पुढारी

ग्रामपंचायत निवडणूक : आजरा तालुक्यात सहा ठिकाणी सत्ताधारी, तीन ठिकाणी सत्तांतर

आजरा : पुढारी वृत्तसेवा आजरा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात सहा ठिकाणी सत्ताधारी आघाडीने आपली सत्ता कायम राखली आहे. तीन ठिकाणी सत्तांतर झाले आहे. तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या पेरणोली ग्रामपंचायतीमध्ये युवा वर्गाने केलेल्या पॅनेलने तालुकापातळीवर नेतृत्व करणार्‍या प्रस्थापित नेत्यांना चारीमुंड्या चीत करीत सरपंचपदासह आठ जागा जिंकल्या.

रविवारी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रित निवडणूकीत सरासरी ८०.३५ टक्के मतदान झाले. आज (सोमवार) सकाळी साडेआठ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय आजरा येथे मतमोजणीस सुरूवात झाली. बहुतांश गावांत सुरूवातीचे कल सत्ताधारी आघाडीच्या बाजूने होते. मात्र पेरणोलीत सुरूवातीपासूनच युवा आघाडीने आपले वर्चस्व निर्माण केले. तासाभरात सगळेच निकाल हाती आले. यामध्ये इटे, मसोली, सुलगाव, हरपवडे, देऊळवाडी, वेळवट्टी येथे सत्ता राखण्यात सत्ताधारी आघाडीला यश मिळाले.

पेरणोली, बुरूडे, मेढोंली येथे सत्तांतर झाले आहे. तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या पेरणोली ग्रामपंचायतीमध्ये युवा आघाडीने सरपंचपदासह आठ जागा जिंकल्या. सरपंचपदी प्रियांका जाधव यांनी ८०३ मते घेत तब्बत ५३३ मतांची विजयी आघाडी घेतली. येथे रवळनाथ ग्रामविकास आघाडील दोन जागांवर समाधान मानावे लागले. येथे माजी सभापती उदयराज पवार, साखर संचालक राजेंद्र सावंत, श्रीपतराव देसाई, सचिन देसाई या मातब्बरांना पराभवाचा धक्का बसला. इटे येथे जयवंत शिंपी गटाचे विलास पाटील यांनी सरपंचपदासह आठ जागा जिंकत आपली सत्ता कायम राखली. येथे सरपंचपदी ज्योती चव्हाण विजयी झाल्या. बुरूडे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासह पाच जागा जिंकत भावेश्वरी-हनुमान परिवर्तन ग्रामविकास आघाडीने सत्तांतर घडवून आणले. भावेश्वरी-जांभुळदेव विकास आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. येथे सरपंचपदी वैशील गुरव सहा मतांनी विजयी झाल्या.

विद्यमान सरपंच महेश कांबळे यांचा पराभव झाला. मसोली ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासह आठ जागा जिंकत मसवाईदेवी ग्रामविकास पॅनेलने आपली सत्ता कायम राखली येथे सरपंचपदी चंद्रकांत गुरव यांनी बाजी मारली. मेंढोली येथे केदारलिंग महाविकास आघाडीने सरपंचपदासह सात जागा जिंकत सत्तांतर केले. येथे सरपंचपदी विलास जोशीलकर विजयी झाले. सुलगाव येथे महादेव सुलगाव विकास आघाडीने सरपंच पदासह सहा जागा जिंकल्या. पांढरदेवी परिवर्तन ग्रामविकास आघाडीला दोन जागावर समाधान मानावे लागले. येथे सरपंचपदी पांडुरंग खवरे ११ मतांनी विजयी झाले.

हरपवडे येथे रासाई ग्रामविकास आघाडीने सरपंच पदासह सात जागा जिंकल्या. येथे या आघाडीची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. सरपंचपदी सागर पाटील विजयी झाले. वेळवट्टी ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन मधील दोनही जागा जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई गटाने जिंकल्या. येथे सरपंचपदासह सदस्य पदाचा पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. देऊळवाडी येथे एका जागेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे संतराम सावंत विजयी झाली. या ठिकाणी सरपंचपदासह सदस्यपदाच्या पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button