मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात आज आंदोलनाची मशाल पेटणार | पुढारी

मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात आज आंदोलनाची मशाल पेटणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी रविवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता दसरा चौकात आंदोलनाची मशाल पेटविण्यात येणार आहे; तर सोमवार, दि. 30 पासून कोल्हापूर शहरासह सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी साखळी उपोषण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवनमध्ये ही बैठक झाली.

सर्वपक्षीय नेत्यांनी आजपर्यंत मराठा समाजाची फसवणूक केली आहे. हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाविरोधात नसून सर्वच पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्यात येणार आहे. नेत्यांना सार्वजनिक सभा, समारंभांना प्रवेशबंदीचा निर्णयही झाला. मात्र दु:खद घटना, आपत्तीवेळी आंदोलकांची परवानगी घेऊन गावांत प्रवेश करण्यास मुभा राहील, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नेत्यांनी जाहीर कार्यक्रम घेऊ नयेत, मराठा आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी आरक्षणाबाबत राजिनामे देऊन आदोलनात सहभागी व्हावे, मराठा समाजाच्या आंदोलनात तोडफोड न करता शांततेत आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

कोल्हापुरात वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे आंदोलनाची दाहकता कमी होण्याचा धोका असल्याने एकाच छताखाली आंदोलन झाले पाहिजे, अशी अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली; तर यापुढे मराठा आरक्षणाच्या विरोधात जो राहील, त्याला हिसका दाखवण्याचा इशारा दिला. मराठा समाजास आरक्षण मिळण्यात केवळ नेते अडसर नसून प्रशासकीय अधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप वक्त्यांनी केला.

वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा आरक्षणाच्या चळवळीस पुन्हा उभारी देणार्‍या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी एकजूट दाखवली आहे. सरकारने मराठा समाजास केवळ आशा दाखवू नये, आणखी किती दिवस आम्ही आशेवर राहायचे. जिल्ह्यात 1238 गावे आणि दहा मोठी शहरे आहेत. या प्रत्येक ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येतील. नेत्यांना गावबंदी केली जाईल. त्यासाठी ग्रामपंचायतीसह विविध घटकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. उपोषण काळात सर्व मंत्री, आमदारांनी मुंबईत थांबून मुख्यमंत्र्यांशी आरक्षणासंदर्भात चर्चा करावी.

आजपर्यंत 42 आत्महत्या झाल्या आहेत. मराठा तरुणांनी यापुढे आत्महत्या करू नयेत. तरुणांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहनही मुळीक यांनी केले.

यावेळी शंकरराव मनवाडकर (चंदगड), शिवाजी पाटील (हातकणंगले), संतोष सावंत (इचलकरंजी), सर्जेराव पोवार (शिरोळ), अमरसिंह पाटील (पन्हाळा), सुहास निंबाळकर (राधानगरी), रविशंकर चिटणीस (हुपरी), अनुप पाटील, कमलाकर जगदाळे, बाजीराव नाईक (कोल्हापूर), नितीन काळभर (कागल), चंद्रकांत सूर्यवंशी, संपतराव चव्हाण-पाटील, शैलजा भोसले, भारती पोवार, शंकरराव शेळके, शाहीर दिलीप सावंत, शशिकांत पाटील, फिरोजखान उस्ताद, उदय लाड, संजय पोवार यांची भाषणे झाली. संदीप देसाई यांनी स्वागत केले.

बैठकीस भैया माने, दुर्गेश लिंग्रस, डॉ. संदीप पाटील, डॉ. विद्याताई साळुंखे, डॉ. प्रदीप पाटील, संजय काटकर, सी. एम. गायकवाड, इंद्रजित घाटगे, विकास पाटील, संयोगिता जाधव, संजीवनी नलवडे, सुशील भांदिगरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button