

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा; एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण – आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं', 'मराठ्यांना तातडीने आरक्षण मिळालेच पाहिजे'… अशा विविध घोषणा देत सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी छत्रपती शिवाजी चौकात फसवे सरकार चले जाव' आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी केंद्र व राज्य सरकारला कोल्हापुरी चप्पल दाखवत संतप्त भावना व्यक्त केल्या. प्रसंगी शासनाचे प्रतिनिधी असणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हा बंदीचा इशाराही आंदोलकांनी केला. (Maratha Reservation)
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने मागितलेली मुदत २४ ऑक्टोबरला संपली. यामुळे शासनाची विश्वासार्हताही संपली. मराठा आरक्षणप्रश्नी अनेक वर्षांपासून सुरू असणारी राज्य व केंद्र सरकारकडून फसवणूक कायम सुरू आहे. या विरोधात मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधण्यात आल्या; तर महिलांनी काळे झेंडे दाखविले. संतप्त आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मराठा समाजाचे असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठा समाजाला फसवल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र इथून पुढे मराठा समाज फसणार नाही, येत्या दोन- -चार दिवसांत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले.
आंदोलनात अॅड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, आर. के. पोवार, विजय देवणे, संजय जाधव, संभाजीराव जगदाळे, महादेव पाटील, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, अमित अतिग्रे, अभिषेक देवणे, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील, फिरोजखान उस्ताद, सुरेश कुन्हाडे, रियाज कागदी, पिंटू साळोखे, सुनीता पाटील, माई वाडेकर, पद्मावती पाटील यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
सकल मराठा समाज (शौर्यपीठ) तर्फे मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाचे टप्पे ठरविण्यासाठी आत्मचिंतन शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी सव्वापाच वाजता राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ येथे बैठक आयोजित केली आहे.
हेही वाचा