कोल्हापूर: वाघापूर येथे माऊलींच्या नामघोषात अश्व रिंगण सोहळा उत्साहात
मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा: बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय… अशा माऊली, माऊलीच्या नामघोषात वाघापूर (ता. भुदरगड) येथे गोल अश्व रिंगण पार पडले. जोतिर्लिंग नवरात्रोत्सवा निमित्त अश्व रिंगण सोहळा झाला. यावेळी वारकरी बांधव, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील जोतिर्लिंग देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व सयाजी यशवंत तोरसे यांच्या वतीने आयोजित केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या वैभवशाली पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्यासाठी श्रीमंत उर्जितसिंगराजे शितोळे (अंकलीकर) यांचे मानाचे अश्व निमंत्रित करण्यात आले होते. या रिंगण सोहळ्यास भुदरगड पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी मराठी शाळा ते गावच्या मध्यवर्ती चौकापर्यंत उभे रिंगण व नंतर मराठी शाळेसमोरील भव्य पटांगणावर गोल रिंगण पार पडले. यावेळी वारकर्यांनी माऊली.. माऊली..चा केलेला गजर आसमंतात दुमदुमून गेला. हा रिंगण सोहळा वाघापूर येथे प्रथम झाल्यामुळे तो पाहण्यासाठी अबालवृध्दांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जोतिर्लिंग देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष, सरपंच बापूसाहेब आरडे सर्व सदस्य, पोलिस पाटील दत्तात्रय घाटगे, यशवंत तोरसे, सर्व नवरात्रकरी, वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा

