कोल्हापूर: सरकारचा भांडाफोड अन् कार्यकर्त्यांशी संवाद; हातकणंगलेत ठाकरे गटाच्या १४० सभा | पुढारी

कोल्हापूर: सरकारचा भांडाफोड अन् कार्यकर्त्यांशी संवाद; हातकणंगलेत ठाकरे गटाच्या १४० सभा

अमजद नदाफ

हुपरी: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सरकारच्या  कारभाराचा पर्दाफाश करण्याची मोहिम गावोगाव राबवण्यात आली. जिल्हाप्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव या मतदारसंघात तब्बल १४० संवाद सभा घेऊन आघाडीवर आहेत. तर शासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या या मोहिमेंमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते मात्र रिचार्ज झाले आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘होऊ द्या चर्चा’ ही मोहीम हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवण्यात आली. या मोहिमेतून लोकसभेच्या रणांगणात पुढचे पाऊल टाकत असल्याचा संदेश जाधव यांनी दिला आहे.

सोबतीला मुंबईतील शिवसेना उपनेत्यांची फौज, गावोगावी दौरे करत आखलेला थेट भेट कार्यक्रम, नियोजनातील सुसूत्रता, सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाची अभिनव प्रसिद्धी व संवाद सभेच्या माध्यमातून जनतेच्या मनांत सरकारबद्दल असणारी खदखद जाणून घेण्यासाठी सुमारे १४० संवाद सभा घेतल्या. आता कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठीच लढायचं, असा निर्धार जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केल्याची  चर्चा कार्यकर्ते व जनतेत आहे.

गावोगावी आयोजित करण्यात आलेल्या संवाद सभेला शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, नितीन बानुगडे-पाटील व शितल शेठ-देवरुखकर यांनी मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य शासनाच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड केला. माजी आमदार सुजित मिणचेकर या मोहिमेत सक्रिय होते.

संवाद सभेत उपरा उमेदवार नको, अशीही मागणी झाली. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनाच लढण्याचा आदेश द्यावा, असा सूरही कार्यकर्त्यांचा होता. पक्षातील मोठी फूट आणी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी पक्षाला दिलेला धोका हाही या संवाद मोहितेत चर्चेचा विषय होता. त्यादृष्टीने तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

हेही वाचा 

Back to top button