

हुपरी, पुढारी वृत्तसेवा : येथील सिल्व्हर झोनमधील श्री देवाधिदेव १००८ शीतलनाथ दिगंबर जिनालय येथे प्रतिष्ठापित होणाऱ्या मूलनायक जिनेंद्र भगवंतांच्या भव्य ६३ इंची प्रतिमेचा भव्य मंगल प्रवेश व जिनचैत्य महिमा शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हत्ती, घोडे, रथ यात सहभागी झाले होते. तर हजारो श्रावक, श्राविका यात सहभागी झाले होते. ही शोभा यात्रा एक किलोमीटरहून अधिक अंतराची अशी भव्य होती.
सिल्व्हर झोन, हुपरी येथील निर्माणाधिन जिनालयामध्ये परम वीतरागी, देवाधिदेव, तीर्थंकर श्री १००८ शीतलनाथ यांची प्रतिमा विराजमान होणार आहे. याकरिता जिनालयाचे निर्माण कार्य मोठ्या उत्साहाने सुरू आहे. श्री जिनेंद्र भगवंतांची भव्य ६३ इंची प्रतिमेचा चंदेरी नगरी हुपरीमध्ये आज मंगल प्रवेश झाला. भव्य शोभायात्रेने स्वागत करण्यात आले.
शोभायात्रेत ५ मंगलवाद्ये, १००८ मंगल कलश, २४ रथ, ११ घोडे व हत्ती यांचा समावेश होता. श्री १००८ चंद्रप्रभ दिगंबर जिनालयपासून मेन रोड हुपरी ते श्री देवाधिदेव १००८ शीतलनाथ जिनालय, सिल्व्हर झोन अशी शोभायात्रा काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने श्रावक, श्राविका सहभागी झाले होते. शोभा यात्रेमुळे हुपरी परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने या भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा