कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मसाला तयार करण्याच्या मशिनमध्ये साडीचा पदर अडकून त्याचा गळ्याला फास लागल्याने शिवाजी पेठ येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. लता रत्नाकर रेवणकर (वय 48, रा. खंडोबा तालीमजवळ, शिवाजी पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे.
लता रेवणकर या सायंकाळी राहत्या घरात मशिनवर मसाला तयार करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीचा पदर मशिनमध्ये अडकला. पदराचा गळ्याला फास लागून त्यांचा मृत्यू झाला. मुलगा रोहन व शेजारी राहणार्या नागरिकांना घटनेची माहिती कळताच त्यांनी बेशुद्धावस्थेत महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. नवरात्रौत्सव काळात ही घटना घडल्याने शिवाजी पेठ परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, शिवाजी पेठेतील नागरिकांनी शासकीय रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली होती. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली, जावई, असा परिवार आहे.
हेही वाचा :