अजित पवार मुख्‍यमंत्री होणे हे स्‍वप्‍नच राहिल : शरद पवार | पुढारी

अजित पवार मुख्‍यमंत्री होणे हे स्‍वप्‍नच राहिल : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अजित पवार मुख्‍यमंत्री होणे हे स्‍वप्‍नच राहिल, हे स्‍वप्‍न कधीच वास्‍तवात येणार नाही, असे स्‍पष्‍ट करत महाराष्‍ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा विश्‍वास राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी आज (दि.१२) पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्‍याबाबत आम्‍ही सकारात्‍मक आहोत, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले. ( Sharad Pawar, Press Conference )

या वेळी शरद पवार म्‍हणाले की, “राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये सुप्रिया सुळे यांना अध्‍यक्ष करण्‍याचा प्रस्‍ताव छगन भुजबळ यांनीच मांडला होता. आता स्‍वत: भुजबळ यांनी आपण खोटे बोललो हाेताे, अशी कबुली दिली आहे. त्‍यामुळे याबाबतचे सत्‍य सर्वांसमोर आले आहे.”

१९७७ मध्‍ये विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नव्‍हता तरीही विजय झाला

अनेक राज्‍यांमध्‍ये स्‍थिर सरकार फोडून भाजपने सत्ता हस्‍तगत केली आहे. भाजपविरोधातील सर्व पक्षांना आम्‍ही एकत्र घेणार आहोत, १९७७ मध्‍ये विरोधी पक्षांनी निवडणूक लढवली त्‍यावेळी पंतप्रधानपदाचा चेहरा नव्‍हता. तरीही देशातील जनतेने केंद्रात सत्ता बदल केला होता. त्‍यामुळे इंडिया आघाडी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार का याला महत्त्‍व नाही, असेही त्‍यांनी या वेळी सांगितले.

कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करणे चुकीचे

कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करणे चुकीचे आहे. जो व्‍यक्‍ती कंत्राटी पद्धतीने काम करतो त्‍याचा करार हा ९ महिने किंवा १२ महिने असतो. त्‍यामुळे त्‍याची कामाशी बांधिलकी राहत नाही. त्‍यामुळे महाराष्‍ट्र सरकारने कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्‍याचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा :

Back to top button