Navratri 2023 : नवरात्रीत नवरंगांची वस्त्र नवलाई | पुढारी

Navratri 2023 : नवरात्रीत नवरंगांची वस्त्र नवलाई

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  नवरात्रौत्सवात तरुणाईचे आकर्षण आहे ते रासगरबा आणि दांडियाचे. गरब्यासाठी लागणारे कपडे, दागिने अन्य मँचिंग वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. गुजराती लोकांसाठी रास गरबा खूप विशेष असतो. त्यात कोल्हापूरच्या लोकांची भर पडली आहे. केवळ उत्सवकाळात गरब्याचे ड्रेसेस आणि आर्टिफिशिअल दागिन्यांची उलाढाल यंदा कोटींच्या घरात होईल, अशी शक्यता विक्रेत्यांकडून वर्तवली जात आहे. ट्रेंड बदलला असला तरी नवरंगांची नवलाईने बाजारपेठ सध्या फुलली आहे.

गरब्यासाठी तरुणाईत फ्यूजन लूकला पसंती असून मुली लेहंग्यांऐवजी कवड्यांचे वर्क असलेली धोती पँट आणि त्यावर कॉन्स्ट्रास्ट रंगातील टॉप यासह डिझायनर चनिया-चोली, रजवाडी, मयुरी नेट, सनेडो, रामलीला झुमका, कच्छी वर्क, फॅन्सी धोती, नक्षीकाम केलेल्या जॅकेटस्ची मागणी करत आहेत. त्यावर बीडस् व पारंपरिक ज्वेलरीतील मोठे झुमके नेकपीसने हा लूक उजळून निघतो. तसेच तरुणांईसाठी स्पेशल केडियातील विविध प्रकारांसोबत चिमुकल्यासाठीही विशेष पेहराव खरेदी करता येत आहे. साधारण 2 हजारांपासून पुढे त्यांची विक्री सुरू असून दरदिवशी वेगळा ड्रेस खरेदी करताना खर्चही वाढत आहे.

पारंपरिक पोशाखासह साजशृंगारासाठी बाजारात नवीन आर्टिफिशिअल ज्वेलरी बाजारात विक्रीस दाखल झाली आहेत.ऑक्साईडच्या ज्वेलरी सेटसह नेकलेस, चोकर, पेंडंट, अंगठी, झुमके, कमरपट्टा, मोती ज्वेलरी, बाजुबंध, मांगटिका, कडा आदी आकर्षक ज्वेलरीही विक्रीस आहे.

कपडे भाड्याने घेणार्‍यांची संख्या सर्वाधिक

गरबा दांडियासाठी ड्रेस शिवून घेणे म्हणजे खर्चाची बाब असते. त्यातच आपल्या आवडीप्रमाणे डिझाईन, कपडा मिळेल याची शक्यताही कमी असते. याशिवाय या कपड्यांचा नेहमी वापर होत नाही, त्यामुळे हे कपडे भाड्याने घेणार्‍यांची संख्या अधिक आहे. नवरात्रीत केडिया, मिरर वर्क,चनिया चोळीसारखे कपडे सुरत, अहमदाबादमधील बाजारातून मागवले जातात.

दांडियाही झाल्या फॅशनेबल

नवरात्रौत्सवात कपडे आणि दागिन्यांप्रमाणे दांडियाही फॅशनेशबल झाले आहेत. तरुणाईच्या मागणीनुसार सध्या बाजारात बहुढंगी दांडिया, एलईडी स्टिकच्या डिस्को दांडिया, मुलींमध्ये प्रसिद्ध असलेल्या झुमकेवाल्या दांडिया, राजस्थानी बाहुल्या मध्यभागी लावून तयार करण्यात आलेल्या राजा राणी दांडिया, बांधणीच्या कपड्यापासून तयार केलेल्या बांधणी दांडिया बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

Back to top button