कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : सतेज पाटील- महाडिक आमने-सामने येणार? | पुढारी

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : सतेज पाटील- महाडिक आमने-सामने येणार?

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : राज्यातील विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या ६ विधानपरिषदेच्या जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मुंबईतील दोन जागांवर निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, धुळे, अकोला आणि नागपूर या मतदारसंघात निवडणूक होत आहे.

कोल्हापूर विधानपरिषद जागेचा विचार करता मागील सहा वर्षांत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय स्थितीत कमालीचा बदल झाला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सतेज पाटील यांच्याकडे एकही सत्ताकेंद्र नव्हते. पण त्यानंतर महापालिका निवडणुकीत २९ जागांवर विजय मिळवत सतेज पाटील यांनी जोरदार कमबॅक केला. दुसरीकडे सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सर्वच सत्ताकेंद्रात सहभाग असलेल्या महाडिक कुटुंबाला खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यासह गोकुळ दूध संघाच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.

राज्यात आकारास आलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला विधान परिषद निवडणुकीत कायम राहिल्यास पालकमंत्री पाटील यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बळ मिळू शकते. त्याचबरोबर विधान परिषद निवडणुकीत पक्षीय पातळीपलीकडे जाऊनही मोर्चेबांधणी केली जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.

कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक : पाटील-महाडिक लढत रंगतदार होणार?

विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत ३१ डिसेंबर २०१५ ला काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी पराभव केला. पाटील यांना २२० तर महाडिक यांना १५७ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधातील उमेदवार कोण असेल, यावरच लढत रंगतदार होणार की एकतर्फी होणार, हे स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : गावात लाईट आली आणि साजरा झाला खरा दीपोत्सव | Diwali2021 | #pudharionline

Back to top button