

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरात पोवई नाका येथे आमदार शिवेंद्रराजेंनी स्वखर्चातून सेल्फी पॉईंट उभारला आहे. आज (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. त्या आधीच खासदार उदयनराजे यांनी सेल्फी पॉईंटची पाहणी केली. तेथे उदयनराजेंना पाहून काहींनी त्यांचे सेल्फी पॉईंटसह छायाचित्र काढले. उदयनराजेंनी देखील सहका-यांसमवेत तेथे छायाचित्र काढले.
सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात जोरदार टीका सुरू आहेत. त्यातच उदयनराजे यांनी उदघाटनापुर्वीच केलेल्या पाहणीमुळे आता शिवेंद्रराजे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान हा सेल्फी पॉईंट सातारकरांसाठी एक अनोखा असून उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे मित्र समूहाने केले आहे.