‘मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार’, नवाब मलिक यांचा फडणवीसांना इशारा | पुढारी

'मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार', नवाब मलिक यांचा फडणवीसांना इशारा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांचे हे आरोप मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. फडणवीसांनी योग्य माहिती घेऊन बोलावं. मी कोणत्याही अंडरवर्ल्डशी संबंधित माणसाकडून संपत्ती घेतलेली नाही. फडणवीसांनी केलेले आरोप खोटे असून त्यांनी फोडलेले फटाके फुसके निघाले. जे काही आरोप करायचे आहेत ते करा मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा मलिक यांनी दिलाय.

फडणवीसांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांनी यंत्रणांकडे जावे. मी चौकशीला तयार आहे, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले आहे. मी कोणत्याही चौकशीली तयार आहे. नवाब मलिक काही घाबरणारा नाही. मी हसिना पारकरना ओळखत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘मुबंई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदच्या जवळच्या माणसाकडून नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबाने कवडीमोल दराने जागा खरेदी केली. या प्रकरणातील दोन्ही व्यक्ती या टाडाखाली अटकेत होत्या. तरीही मलिक यांनी त्यांच्याशी व्यवहार केले. यावरून मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मलिक यांनी कुर्ला येथील गोवावाला कॉम्प्लेक्समधील २ एकर ८० एकर जमीन विकत घेतली आहे. या जमिनीचे मूल्य कोट्यवधी रुपये आहे. ती केवळ ३० लाखांना विकत घेतली. हा मुद्दा सुरू झाला तेव्हा मलिक मंत्री होते. त्यांना खान आणि पटेल कोण आहेत हे माहीत होते. मुंबई बॉम्बस्फोटाशी संबधित व्यक्तीशी व्यवहार केलाच कसा?’, असा सवाल फडणवीस यांनी केला. त्याला मलिक यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

हे ही वाचा :

Back to top button