‘मधाचे गाव पाटगाव’ला ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन गाव’ नामांकन | पुढारी

‘मधाचे गाव पाटगाव’ला ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन गाव’ नामांकन

गारगोटी : रविराज वि. पाटील : मधाचे गाव, अशी राज्यभर ओळख असलेल्या भुदरगड तालुक्यातील पाटगावला ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ (गाव) या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी नामांकन मिळाले आहे. शेतीपूरक किंवा अन्य नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत लक्षणीय काम करणार्‍या गावांसाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. पाटगावच्या नामांकनामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे.

पाटगावने राज्यात मधाचे गाव, अशी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यातून गावातील बहुतांश लोकांना रोजगारही मिळाला आहे. त्यामुळे केंद्रस्तरावरील या मानाच्या स्पर्धेमध्ये पाटगावला नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे, देशपातळीवरच्या या महत्त्वाच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून एकमेव पाटगावची निवड झाली आहे, याबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

कोकण आणि घाटमाथ्याचा सुरेख संगम जपणारे, मौनी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले हे गाव. या गावात अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने मधुमक्षिका पालन व मध संकलनाचा व्यवसाय केला जातो. 1,500 लोकसंख्या आणि 375 कुटुंबे असलेल्या या गावाला नव्या उपक्रमामुळे नावलौकिक मिळाला आहे. जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने यावर्षी येथे ‘मधाचे गाव पाटगाव’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे मध उत्पादन, विक्री व पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन गाव स्वावलंबी होण्यास मदत झाली आहे. मधमाशी पालनासाठी या गावात होत असलेल्या प्रयत्नांची दखल देशपातळीवरही घेतली जात आहे. हा उपक्रम देशातील पथदर्शी उपक्रम ठरणार आहे. पाटगावच्या या उपक्रमाला पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार अश्विनी अडसूळ, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकार्‍यांनी सतत पाठबळ दिले आहे.

या उपक्रमांतर्गत गावात अनेक लक्षवेधी फलक, सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. तसेच मधुमक्षिका पालन प्रशिक्षण, अभ्यास भेट कार्यक्रम झाले. ग्रामपंचायत कार्यालयाचे रूप पालटले आहे. मधमाश्यांचे संवर्धन-निसर्गाचे संरक्षण या उपक्रमांतर्गत याला वेगळा आयाम दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button