

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथे बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त जागर लाखो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवात येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत भक्तगण भक्ती रसात नाहून गेला होता. आज (दि.४ सप्टेंबर) पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बाळूमामांच्या समाधी पूजन, आरती नंतर दर्शनासाठी भक्तांच्या लांब रांगा लागून राहिल्या होत्या. सर्वांना योग्य पद्धतीने दर्शनाचा लाभ घेता येईल अशी दर्शना रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविक समाधानी दिसत होता.
गेले सात दिवस या ठिकाणी सद्गुरु श्री बाळूमामा यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम महा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समाधी पूजन, काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, राम कृष्ण हरी जप, बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, हरि कीर्तन, जागर अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वरी पारायणासाठी सहाशेवर वाचक सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या विक्रमी होती. महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार यांनी आपली सेवा बाळुमामा चरणी अर्पण केली. गेल्या सात दिवसात या ठिकाणी भाविकांच्या मांदियाळीत भक्तिमय वातावरणात भक्तगण रंगून गेला होता. बाळूमामाच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी व मूर्ती तसेच मंदिरावर विविध प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली होती.
सोमवार दिनांक ४ सप्टेंबर बाळूमामाच्या पुण्यतिथी दिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगता करण्यात आली. यावेळी उपसरपंच राजनंदिनी भोसले यांच्या हस्ते विना पूजन करून सांगता झाली. प्रसंगी बाळूमामा मंदिरा सभोवती पालखी सोहळा संपन्न झाला. ढोल वादन ,हरी भजन ,टाळ मृदंगाच्या आवाजात पालखी सोहळ्यात भक्त रंगून गेले. पुण्यतिथी दिनानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भुदरगडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी शिवराज नाईकवडे, भाऊसाहेब पाटील, नानासाहेब पाटील,बाळासो पाटील, भक्तगण उपस्थित होते.