कोल्हापूर: बेडग येथील दलित समाजाला संरक्षण देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन | पुढारी

कोल्हापूर: बेडग येथील दलित समाजाला संरक्षण देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा : बेडग (ता. मिरज) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी बेडगचे सरपंच उमेश पाटील आणि उपसरपंच संभाजी उर्फ मल्हारी नागरगोजे व एक अनोळखी अशा तिघांविरुध्द मिरज ग्रामीण पोलिसांत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने दलित समाज बांधव तणावाखाली आहेत. त्यांना संरक्षण मिळावे आणि मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे रामदास मधाळे यांनी सांगितले.

बेडग (ता.मिरज) येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होत असलेली स्वागत कमान सरपंच, उपसरपंच यांनी पाडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच, उपसरपंच यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सोमवारी (दि.२४) गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या निषेधार्थ कुरुंदवाड येथील माळ-भाग सिद्धार्थ चौक येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता माजी नगरसेवक अनुप मधाळे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक व आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक मधाळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमान पाडल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन गुन्हे दाखल केले आणि बौद्ध समाजाला न्याय दिला. हे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी काहींनी मोर्चा काढून बौद्ध समाजाच्या विरोधात केलेले आंदोलन निंदनीय आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि बेडग येथील समाजबांधवांना शासनाने संरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

यावेळी सुनील कुरुंदवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश कांबळे, धम्मपाल ढाले, रितेश लाड, आदींनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने बेडग येथील समाज-बांधवांना संरक्षण देण्यात यावे. बेडग ग्रामपंचायत बरखास्त करावी, अशी मागणी करत मणिपूर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button