Human Sacrifice : गुप्तधनाच्या लालसेतून चिमुकल्याचा नरबळी; महाराष्ट्र हादरला | पुढारी

Human Sacrifice : गुप्तधनाच्या लालसेतून चिमुकल्याचा नरबळी; महाराष्ट्र हादरला

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : Human Sacrifice : मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील नऊ वर्षीय कृष्णाच्या खुनाची उकल ग्रामीण पोलिसांनी केली आहे. गुप्तधनाच्या लालसेतून पाच जणांनी मिळून त्याचा गळा चिरून खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली असून, एक संशयित फरार असल्याचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोहाणे येथील कृष्णा अनिल सोनवणे (९) हा रविवारपासून (दि. १६) वेपत्ता होता. मंगळवारी (दि. १८) पोहाणे गावातील मांजरी नाला येथे कृष्णाचा पुरलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी कृष्णाच्या मृत्यूचे कारण तपासले असता त्याचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कृष्णा शेवटच्या क्षणी कोणासोबत होता, याचा पोलिसांनी शोध घेतला. संशयित गणेश लक्ष्मण सोनवणे (१९) याच्यासोबत कृष्णाला शेवटचे पाहिल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी गणेशला ताब्यात घेत चौकशी केली असता खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी या हत्येप्रकरणी संशयित उमाजी गुलाब मोरे (४२), रोमा बापू मोरे (२५), रमेश लक्ष्मण सोनवणे (२१). गणेश लक्ष्मण सोनवणे (१९, सर्व रा. पोहाणे, ता. मालेगाव) यांना अटक केली. पाचवा संशयित लक्ष्मण नवल सोनवणे (वय ४५) फरार असून, इतर चौघांना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याची उकल करणाऱ्या पथकास पोलिस अधीक्षक उमाप यांनी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Human Sacrifice : विहिरीतील धनासाठी खून

रमेश सोनवणे याच्या अंगात देव येत असल्याचा दावा संशयितांनी केला होता. तसेच गावातील विहिरीजवळ गुप्तधन असून, ते मिळवण्यासाठी नरबळी द्यावा लागेल, असे रमेशने सांगितले. त्यामुळे गणेशचा मित्र असलेल्या कृष्णाला संशयितांनी रविवारी अमावास्येच्यावेळी फूस लावून पळवून नेत खून केला होता. खबऱ्यांचे जाळे, श्वानपथक, उसे तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणण्यात आला.

यांनी केला तपास : मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, अंकुश नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, चेतन संवत्सरकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

हे ही वाचा :

Back to top button