कोल्हापूर : कडवी नदीवरील ८ बंधारे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत | पुढारी

कोल्हापूर : कडवी नदीवरील ८ बंधारे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा- शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ९८ मिमी. पाऊस झाला. धरण ५२.३६ टक्के भरले आहे. पावसाचा जोर वाढल्याने कडवी नदीवरील भोसलेवाडी, शिरगाव, येलूर, कोपार्डे, सवते, सावर्डे, सरूड, पाटणे हे आठ बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अजय पुनदीकर यांनी दिली. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर कायम असून कडवी धरण क्षेत्रात आजअखेर १०७७ मिमी तर कासारी धरण क्षेत्रात १३९२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कडवी धरण १.३२ टीएमसी भरले असून पाणी पातळी ५९३ मीटर तर पाणीसाठा ३७.३० दलघमी इतका आहे. कडवी धरणातून होणार पाण्याचा विसर्ग बंद आहे. धरण क्षेत्रात १ जूनपासून आजअखेर १०७७ मिमी पाऊस झाला. गतवर्षी याच दिवशी १७४६ मिमी पावसाची नोंद झाली होती. तालुक्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

काही ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या तर काही ठिकाणी कौले व पत्रे उडून नुकसान झाले आहे. काही भागात झाडे कोलमडून पडली आहेत. विशाळगड परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. कासारी धरण ५०.६७ टक्के भरले असून धरणात १.३२ टीएमसी पाणीसाठा संकलित झाला आहे. कासारी नदीवरील यवलूज बंधारा पाण्याखाली गेला आहे. विशाळगडावरून पाण्याचे लोट खाली कोसळत असल्याने पायरीमार्ग पाण्याने तुडूंब भरून वाहत असल्याने गडावर चढताना व खाली उतरताना ग्रामस्थ व पर्यटकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Back to top button