कोल्हापूर : पांढरेपाणी-पावनखिंड मार्गावर धोकादायक झाडांची टांगती तलवार | पुढारी

कोल्हापूर : पांढरेपाणी-पावनखिंड मार्गावर धोकादायक झाडांची टांगती तलवार

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : विशाळगड परिसरात पावसाचा जोर वाढला असून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांच्या फांद्या वाऱ्यामुळे तुटून पडत आहेत. पावसाळा सुरू झाला असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढरेपाणी-पावनखिंड रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडांच्या धोकादायक फांद्या तोडलेल्या नाहीत. या फांद्या कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संबंधित विभाग या फांद्या छाटणार कधी? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

गतवर्षी विशाळगड मार्गावरील पांढरेपाणी-पावनखिंड दरम्यानच्या रस्त्यावर झाड कोसळून सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. तर दोन वर्षांपूर्वी विशाळगड बस मलकापूरकडे जात असताना पांढरेपाणी नजीक भले मोठे झाड कोसळले होते. नशीब बलवत्तर म्हणून बस पुढे गेली आणि काही क्षणार्धात झाड मागे कोसल्याने मोठा अनर्थ टळला होता. अशा वारंवार घटना या मार्गावर होत असल्याने मार्ग पावसाळ्यात धोकादायक बनतो. सध्या अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर धोकादायक लटकत आहेत. पांढरेपाणी ते मालाईवाडा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वटलेली झाडे उभी आहेत. तर काही लटकत, मोडलेल्या स्थितीत आहेत. ती केव्हाही कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. संबधित विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button