नारायण राणे म्हणाले, ‘ठाकरे पितापुत्रांसह संजय राऊत जेलमध्ये जाणार’ | पुढारी

नारायण राणे म्हणाले, ‘ठाकरे पितापुत्रांसह संजय राऊत जेलमध्ये जाणार’

राजापूर, पुढारी वृत्तसेवा : रमेश मोरे व जया जाधव यांच्या खुनाला कारणीभूत कोण? याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह जाहीर करणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. दिशा सालियान व सुशांतसिह राजपूत यांचा खूनच झाला आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत हे जेलमध्ये जातील, असे सुतोवाच राजापूर येथील सभेत ना. राणे यांनी केले आहे.

सोमवारी सायंकाळी राजापूर हायस्कूलच्या मैदानावर मोदी @9 च्या अभियानाची समारोप सभा पार पडली. यावेळी भाजपा मुंबईचे आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नीतेश राणे, बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नीतेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. विनायक राऊत म्हणजे कोकणच्या विकासाच्या आडवे येणारे काळे मांजर असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. आमदार प्रवीण दरेकर यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडताना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. तर आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या लोकहिताच्या निर्णयांचा आढावा घेतला. सर्वच नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, मी 39 वर्ष शिवसेनेत काढली आहेत. मी कायम मातोश्रीच्या आत होतो. त्यामुळे माझ्याइतके उद्धव ठाकरे यांची कुंडली कोण सांगू शकेल? असा प्रतिप्रश्न केला. रमेश मोरे व जया जाधव यांच्या खुनाचे खरे सूत्रधार कोण हे मला माहिती आहे. लवकरच याबाबत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आता शिवसेना संपलेली आहे. त्यांचा जास्त विचार करू नका, आता केवळ 5 खासदार व 15 आमदार उरले आहेत. येत्या निवडणुकीत तेही नसतील. ज्यांचे आता काही अस्तित्व उरलेले नाही अशांचा विचार करू नका.

येत्या 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाची राजापूर लोकसभा मतदारसंघातील जागा निवडून येण्यासाठी मतांच्या बेरजेचे गणित करा व कामाला लागा, असे आवाहन ना. राणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे हे केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले. त्यांनी लोकहिताचे काय निर्णय घेतले? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी फक्त हत्या केल्या, असा आरोप राणे यांनी यावेळी बोलताना केला. भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा…

Back to top button