केंद्राने काय केले हे सांगण्यापेक्षा राणे करतात उद्धव ठाकरेंवर टीका | पुढारी

केंद्राने काय केले हे सांगण्यापेक्षा राणे करतात उद्धव ठाकरेंवर टीका

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : केंद्रात मोदी सरकारने काय केले हे सांगण्यासाठी राजापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, केंद्र शासनाने काय केले. हे सांगण्याऐवजी राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे काम केले. केंद्रीय मंत्र्यांनी आधी स्वत:च्या बुडाखाली काय जळते आहे, हे पाहावे असा सल्लाही खा. राऊत यांनी दिला. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत खा. राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली.

आ. रमेश मोरे व जयंत जाधव यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे. हा विषय सगळ्यांना माहीत आहे. केंद्रीय मंत्री मत्सराने प्रेरित होऊन आरोप करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दहा वर्ष पुरणार नाहीत, असा टोलाही खा. विनायक राऊत यांनी लगावला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, प्रमोद शेरे, माजी जि. प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे उपस्थित होते.

पीएम फंडाचे काय झाले हे जाहीर करा

टीका करण्याऐवजी हिंमत असेल तर स्वत:च्या मंत्रिमंडळामार्फत रत्नागिरी व सिंधुदुर्गात किती योजना आणल्या हे जाहीर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. कोरोना काळात मुख्यमंत्री असताना कशापद्धतीने उद्धव ठाकरे यांनी काम केले हे सार्‍या जनतेने पाहिले. परंतु, पंतप्रधान मोदी देशभरात किती ठिकाणी फिरले, हेही त्यांनी एकदा जाहीर करावे. पीएम फंडामध्ये कोरोनाकाळात कोट्यवधी रुपये जमा झाले. त्याचे काय झाले हेही त्यांनी सांगावे.

Back to top button