

राशिवडे:-प्रवीण ढोणे : पाणीदार आणी हिरवागार जिल्हा म्हणुन प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा पुर्णपणे खालावला आहे. पावसाने दडी मारल्याने पिके करपुन निघत आहेत. तर काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी धरणांतील उरले-सुरले पाणीसाठे पिण्यासाठी राखीव ठेवण्याची दुर्देंवी वेळ प्रशासनावर आली आहे. (Kolhapur News )
धरणांचा तालुका म्हणुन राधानगरी तालुक्याची ओळख आहे. १९८२ साली बांधलेल्या काळम्मावाडी धरणाची २५.२९ टी. एम. सी. पाणीसाठा क्षमता आहे. या धरण क्षेत्रामध्ये वार्षिक सरासरी ४९३० मि.मी.पाऊस पडतो. पण आज अखेर पाऊसच पडलेला नाही. सध्या या धरणामध्ये १.२४ टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हा साठा ६.१४ टी.एम.सी.इतका होता. धरणाच्या ग्राउंटींग कामासाठी सुमारे सहा टी.एम.सी.पाणी सोडल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यापुर्वी २००७ मध्ये धरण पुर्ण रिकामे झाले होते. तर २०१६ मध्ये ०.९० टी.एम.सी तर २०२३ मध्ये १.२४ टी.एम.सी. इतका निच्चांकी साठा शिल्लक राहीला.
राधानगरी धरणाची पाणीसाठा क्षमता सात टी.एम.सी. इतकी आहे. वार्षिक सरासरी ५५७० मि.मी. पाऊस होतो पण पावसाने पाठ फिरविल्याने या धरणातीलही पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या या धरणामध्ये १.६६ टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक असुन यामधील १ टी.एम.सी. साठा मृत आहे, त्यामुळे ०.६६ टी.एम.सी.साठा वापरण्यास उपयुक्त असुन हा साठा कसाबसा आठवडाभरा पुरताच आहे. यापुर्वी २००७, २००९, २०१६ आणी २०२३ मध्ये निच्चांकी पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. भोगावती नदीपात्रामध्ये काळम्मावाडी धरणातुन गैबी बोगद्यामधील सरासरी पाच ते सहा टी.एम.सी.पाणी सोडले जात होते परंतु यंदा हे पाणी न सोडल्याने त्याचा ताण राधानगरी धरणावर पडला व राधानगरी धरणातुन पाणी सोडावे लागल्याने हे धरण ठणठणीत झाले.
३.४७ टी.एम.सी. पाणीसाठा क्षमता असलेल्या तुळशी धरणामध्ये सध्या अर्धा टी.एम.सी.पाणीसाठा शिल्लक आहे, गतवर्षी हा साठा दीड टी.एम.सी.इतका शिल्लक होता. याठिकाणी गतवर्षी ३६१३ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. सध्या मात्र पावसाचा थेंबही पडलेला नाही. साधारणत: जिल्ह्याची तहान भागविणारी काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी ही धरणे कोरडी पडली आहेत. जर पाऊस लांबला तर जिल्ह्यावर पाणीबाणीचे संकट ओढावण्याची भिती आहे. या धरणामधील शिल्लक असणारे पाणीसाठी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा