

कराड, पुढारी वृत्तासेवा : सातारा बाजार समितीच्या कार्यक्रमावरून बुधवारी साताऱ्यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांत जोरदार वाद झाला होता. याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हाही दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी सकाळी कराडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी रात्री उशिरा कराड मधील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखल झाले. गुरुवारी सकाळी प्रथम खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कराडमधील आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यानंतर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आपल्या समर्थकांसह कृष्णा विश्व विद्यापीठाच्या विश्रामगृहात दाखल झाले.
तत्पूर्वीच विश्रामगृहात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, डॉक्टर अतुल भोसले यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. सर्व नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मात्र या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी बुधवारच्या वादावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.