कोल्हापूर : विशाळगडावरील ‘मुंढा दरवाजाची डागडुजी | पुढारी

कोल्हापूर : विशाळगडावरील 'मुंढा दरवाजाची डागडुजी

विशाळगड; सुभाष पाटील : विशाळगड येथील मुंढा दरवाजाचे दगड निखळू लागल्याने दरवाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचे वृत्त दै. पुढारीने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत विशाळगडाच्या संवेदनशील उपसरपंच पूनम जंगम व त्यांचे पती विकास जंगम यांनी घेऊन निखळलेले दगड स्वखर्चातून त्वरित डागडुजी केल्याने सध्या तरी दरवाजाच्या धोका टळला आहे. पुरातत्व विभागाने निखळणाऱ्या दगडांची डागडुजी करून मुंढा दरवाजा सुरक्षित करावा, अशी मागणी यावेळी गडवासीय, पर्यटक, भाविक आणि इतिहास प्रेमींतून होत आहे.

शिवकाळात गडपायथा ते गड दरम्यान सात दगडी कमान्या होत्या. काळाच्या ओघात सहा कमान्या नामशेष झाल्या. उर्वरित ‘मुंढा उर्फ चोर दरवाजा’ पडझडीतही तग धरून होता. पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मुंढा दरवाजा ही वास्तूही नामशेष होण्याच्या मार्गावर होती.

दै ‘पुढारी’ ने दरवाजाच्या दुरावस्थेबाबत वारंवार बातम्या प्रसिध्द केल्याने अखेर दरवाजासाठी सुमारे ५७ लाखांचा निधी प्राप्त झाला. डागडुजीचे काम २०१६ मध्ये पूर्ण झाले. दरवाजाच्या उभारणीने इतिहासाला उजाळा मिळाला. गडावर हौसे-नवसे पर्यटकांचा ओढा वाढला.

हुल्लडबाज तरुणांची टोळकीही वाढली. पर्यटकांचे सेल्फीचे, गर्दीचे ठिकाण बनले. दरवाजाचे दगड निखळू लागल्याने दै. पुढारीने ‘मुंढा दरवाजाची सात वर्षात दुरावस्था’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करताच उपसरपंच पूनम जंगम व त्यांचे पती विकास जंगम हे दरवाजाच्या जतन व संवर्धनासाठी पुढे येऊन निखळलेले दगड पूर्ववत बसविल्याने पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे.

मुंढा दरवाजा हे गडाचे वैभव आहे. दगड निखळू लागल्याने वैभव धोक्यात येईल हा विचार करून आम्ही उभयतांनी निखळलेल्या दगडाची स्वखर्चातून डागडुजी केली. गडाच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी. तसेच दरीलगत पुरातत्वने संरक्षक कठडे उभारावेत,

– पूनम जंगम, उपसरपंच विशाळगड

हेही वाचा;

Back to top button