सांगली: ऐतवडे येथे सहा तासानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश | पुढारी

सांगली: ऐतवडे येथे सहा तासानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश

ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : ऐतवडे बुद्रुक, लाडेगावच्या घोल परिसरात आप्पासो नेमगोंडा पाटील शिरोटे यांच्या विहिरीत रात्री बिबट्या पडला होता. आज (दि.९) सकाळी शिरोटे मोटर चालू करण्यासाठी आले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले, यांची माहिती वनविभागाला कळवताच वनविभागाचे कर्मचारी पिंजऱ्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

सकाळी 10 पासून पिंजरा व लाकडी फळ्या पाण्यात सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, सहा महिन्याचा असलेला बिबट्या घाबरलेल्या अवस्थेत पाण्यात एका कोपऱ्याला बसलेला होता. यामुळे तो बाहेर येणासाठी प्रतिसाद देत नव्हता. यामुळे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती. अखेर दुपारी 3 वाजता लाकडी फळीवर बसल्याने जेसीबीच्या साहाय्याने पिंजरा पाण्यात सोडल्याने बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला व त्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.

या रेस्क्यूमध्ये रेंजर मानतेज भगले, भगवान गायकवाड, निवास ऊगळे, अनिल पाटील, भिवा कोळेकर, अश्विनी वाघमारे, विशाल डुबल यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

ऐतवडे बुद्रुकसह, ढगेवाडी, कार्वे, शेखरवाडी, लाडेगाव, इटकरे, येडेनिपाणी, कुरळप परिसरात अनेक वेळा बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या मेंढ्या, कुत्री, जनावरे दगावली आहेत. शेतीच्या मशागतीचे कामे चालू असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, बिबट्या किंवा अन्य वनजन्य प्राणी दिसून आल्यास त्याला हुसकावण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. तत्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन मानतेज भगले यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button