कोल्हापूर : शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारींची चोरी; शेतकरी धास्तावले
म्हाकवे; पुढारी वॄतसेवा : आणूर (ता. कागल) येथील वेदगंगा नदीवर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बसवलेल्या दोन विद्युत मोटरींची चोरी झाली. येथील शेतकरी सदाशिव बाळू गंगाधरे व मीना महादेव गंगाधरे यांची शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी आणूर – कौलगे पुलाजवळ बसवलेली पाच एच.पी मोटर तसेच सुभाष चौगुले यांच्या दोन विद्युत पंपाच्या पेठ्यांना जोडलेली विजेच्या खांबापासून मोटर पर्यंतची वायर तसेच श्रीकांत कोळी यांच्या मोटरला जोडलेली वायर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेली. त्यामुळे विद्युत मोटर चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची शंका शेतकरी उपस्थित करत आहेत.
मागील आठवड्यात याच नदीवरील कौलगे हद्दीतील नऊ मोटर तसेच बस्तवडे हद्दीतील एक मोटर चोरट्याने चोरून नेली होती. याच ठिकाणी शरद गंगाधरे यांची मोटर तिसऱ्यांदा चोरून नेली आहे. चोरट्याने विद्युत खांबापासून मोटरीपर्यंतच्या वायरी कटरच्या साह्याने तोडल्या आहेत. वारंवार होणाऱ्या मोटर चोरीच्या प्रकारामुळे शेतकरी धास्तावले असून ऐन उन्हाळ्यात मोटर चोरीमुळे पिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे मोटर चोरीच्या प्रकारांना आळा घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हेही वाचलंत का ?

