सांगली : दरोड्यासाठी रिलायन्स ज्वेल्सच का? | पुढारी

सांगली : दरोड्यासाठी रिलायन्स ज्वेल्सच का?

सांगली;  स्वप्निल पाटील :  येथील रिलायन्स ज्वेल्सवर टाकलेल्या दरोड्याचा विविध मुद्यांच्या आधारे तपास सुरू आहे. दरोडेखोरांकडून रिलायन्स ज्वेल्सच का हेरले? या मुद्यावरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. तेथे काम करणारे कर्मचारी देखील पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते.

रविवारी दि. 4 रोजी सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकला. दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोर काही महिन्यांपासून रेकी करत होते. दरोडेखोरांनी अनेक अर्थार्ंनी सोपी असणारी सराफी पेढी शोधली. शहरातील काही सराफ पेढीतील सीसीटीव्ही कॅमेरे थेट पोलिस मुख्यालयाशी जोडलेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमले आहेत. रिलायन्स ज्वेल्स हे सांगली-मिरज रस्त्यावरील सेवा रस्त्यावरील तसेच जास्त गर्दी नसणारी पेढी आहे. त्यामुळे दरोड्यासाठी हीच पेढी दरोडेखोरांनी निवडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. यासाठी त्यांनी या पेढीत अनेकवेळा येवून चौकशी देखील केल्याची माहिती समोर आली आहे.

कर्मचार्‍यांच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर पोलिसांकडून काढण्याचे काम सुरू आहे. तसेच या रिलायन्स ज्वेल्समधून कोणत्या कर्मचार्‍याला काढून टाकले आहे का? दरोडेखोरांना स्थानिक कोण सामिल आहे का? शस्त्रधारी सुरक्षा रक्षक का नेमला नव्हता? आदी मुद्यांचा तपास सुरू आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचीदेखील कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.

सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा का?

रिलायन्स ज्वेल्स सोने आणि हिरे विक्री करणारी देशातील मोठी कंपनी. इतक्या मोठ्या कंपनीमध्ये सुरक्षामध्ये इतकी मोठी चूक कशी झाली? सुरक्षा रक्षक म्हणून महिलेला नेमले होते. इतक्या मोठ्या पेढीमध्ये शस्त्रधारी सुरक्षा रक्षक का नेमला नाही? नेमके हेच दरोडेखोरांनी हेरले असावे आणि या ठिकाणी दरोडा टाकला असावा, असा देखील पोलिसांचा अंदाज आहे.

रिलायन्सचे अधिकारी देखील सांगलीत

रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा पडल्यानंतर रिलायन्सचे मुंबईतील काही अधिकारी देखील चौकशीसाठी सांगलीत आले आहेत. त्यांच्याकडून देखील अंतर्गत माहिती घेण्यात येत आहे. रिलायन्सच्या अधिकार्‍यांकडे देखील पोलिसांनी चौकशी केली आहे.

Back to top button