Gadhinglaj Municipal Council: ‘माझी वसुंधरा अभियाना’त गडहिंग्लज नगरपरिषद राज्यात अव्वल | पुढारी

Gadhinglaj Municipal Council: ‘माझी वसुंधरा अभियाना’त गडहिंग्लज नगरपरिषद राज्यात अव्वल

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा: माझी वसुंधरा अभियानात गडहिंग्लज नगरपरिषदेने (Gadhinglaj Municipal Council) गौरवास्पद कामगिरी करताना राज्यात पहिला क्रमांक मिळविला. याबरोबरच भूमी घटकातही पालिकेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला. माझी वसुंधराकरिता ४ कोटी तर भूमीकरिता १.५ कोटी असे एकूण ५.५ कोटी रुपयांचे बक्षिस गडहिंग्लज नगरपरिषदेला प्राप्त होणार आहे.

सोमवारी जागतिक पर्यावरण दिनी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पर्यावरण सचिव प्रवीण दराडे यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले. राज्यातील प्रथम क्रमांकाच्या पर्यावरणपूरक शहराचा बहुमान मिळाल्याबद्दल शहराच्या (Gadhinglaj Municipal Council) शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत गडहिंग्लज पालिकेने सर्व बाबींवर चांगली कामगिरी केली आहे. वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनात उत्कृष्ट काम केले. या अंतर्गत शहरात ६० हजारहून अधिक वृक्षांची गणना झाली असून ३३ टक्के परिसर हरित झाला आहे. याबरोबरच १०० टक्के कचरा संकलन, ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती तयार करुन त्याद्वारे उत्पन्न स्त्रोत तयार केला आहे. १०० टक्के प्लास्टिक बंदी लागू करुन ५ रुपयांत कापडी पिशवी उपलब्ध करुन दिली आहे. वैद्यकीय कचरा, ई-कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन केले आहे. हागणदारीमुक्त अभियानात ओडीएफ पल्स दर्जा मिळाला आहे. शहराची वायू गुणवत्ता उत्तम राखण्यात यश मिळविले आहे. पर्यावरणपूरक सायकल ट्रॅक, विद्युत वाहनांसाठी चार चार्जिंग स्टेशन उभारले आहे. सीआर फंडातून ई-रिक्षा खरेदी केली असून रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डे, सर्व नळांना पाणी मीटर याद्वारे अधिकाधिक पाण्याची बचत केली आहे. नदीघाटाचे सुशोभीकरणाबरोबरच नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे.

शहरात सर्वत्र पथ दिव्यांवर एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. पालिकेच्या चार इमारतींवर सोलार प्रकल्पही कार्यान्वित केले आहेत. याद्वारे वीज बिलांची बचत केली आहे. सौरऊर्जेबाबत मोठ्या प्रमाणावर शहरात जनजागृती केली आहे. तर शहराचा नगरपक्षी चिमणीची मध्यवर्ती ठिकाणी प्रतिकृती उभारून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. या सर्व विविध बाबींची नोंद शासनाने घेतली. याकरिता शहरातील सर्व नागरिक, पदाधिकारी, पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचा मोलाचा वाटा असल्याचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी स्पष्ट केले. यावेळी पाणीपुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, रविनंदन जाधव, निखिल पाटील, ओमकार बजागे उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button