कोल्हापूर विमानतळ नामांतर प्रस्ताव केंद्राकडे : ज्योतिरादित्य शिंदे | पुढारी

कोल्हापूर विमानतळ नामांतर प्रस्ताव केंद्राकडे : ज्योतिरादित्य शिंदे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यास सरकार सकारात्मक आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण सुरू असून येथे कोल्हापूरच्या कला संस्कृतीचे दर्शन घडेल. तसेच कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येणार आहे, असे शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे सांगून ते म्हणाले, देशात महामार्गाचे जाळे विस्तारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रोज 37 किमी महामार्गाची निर्मिती केली जात आहे. विमानतळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात देशात 220 विमानतळ होतील, असे नियोजन आहे. जनधनमार्फत 300 योजनांचे 27 लाख कोटी रुपये थेट नागरिकांच्या खात्यावर जमा होत आहेत.

प्रधानमंत्री आवासमध्ये तीन कोटी घरे, हर घर नळअंतर्गत 11 कोटी 90 लाख लोकांना लाभ मिळाला आहे. 9 कोटी 60 लाख महिलांना उज्ज्वल गॅसचा फायदा झाला. ‘सर्वांचा विकास, सर्वांची प्रगती’ हे सरकारचे ध्येय असून प्रगती विकासाचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नऊ वर्षांत देशात सामाजिक, आर्थिक विकासाचा वेग वाढला. यावेळी खा. धनंजय महाडिक, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक उपस्थित होते.

Back to top button